मविआ सरकार कोसळले! उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला; राजीनामा सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:48 PM2022-06-29T23:48:38+5:302022-06-30T00:06:44+5:30
उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे.
मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर ते राजभवनाकडे निघाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले. यामुळे भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी आपण शिवसेना पक्ष सांभाळणार, असेही म्हटले. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे दोन्ही मुलगे आले होते. अनिल परब, निलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते.
आज शिवसैनिकांना नोटीस पाठवली जाते. केंद्रीय सुरक्षा पथक मुंबईत दाखल होतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही आडवं येणार नाही. घ्या शपथ, बहुमत चाचणी फक्त डोकी मोजली जाणार आहे. कुणाकडे किती संख्या आहे ते बघणार यात मला रस नाही. माझ्याविरोधात एकही माझा माणूस राहिला तर माझ्यासाठी ते लज्जास्पद आहे असंही उद्धव ठाकरे यांनी लाईव्हमध्ये सांगितले.