मविआची शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जागावाटप बाजूला ठेवून घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:15 AM2024-08-22T07:15:01+5:302024-08-22T07:16:00+5:30

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

MVA's call for 'Maharashtra Bandh' on Saturday, the decision was taken to set aside the seat allocation  | मविआची शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जागावाटप बाजूला ठेवून घेतला निर्णय 

मविआची शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, जागावाटप बाजूला ठेवून घेतला निर्णय 

मुंबई : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवून बदलापुरातील घटनेवर चर्चा करण्यात आली आणि याविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी आवाहन मविआच्या नेत्यांनी केले. 

या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, उद्धवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.  

सरकार कोणाला वाचवतंय? : पटोले   
लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठमोठे इव्हेंट केले जात आहेत; पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही. राज्यात सरकार, गृहखाते आहे की नाही, अशी परिस्थिती आहे.
बदलापूरच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असे
सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.

Web Title: MVA's call for 'Maharashtra Bandh' on Saturday, the decision was taken to set aside the seat allocation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.