माझी कृषी योजना : पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:16 PM2019-01-04T12:16:19+5:302019-01-04T12:18:05+5:30
या प्रकल्पांतर्गत संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा पुरविण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
राज्यातील विदर्भ व मराठवाडा विभागात दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सहकार्याने विशेष प्रकल्प राबविण्याची योजना आखण्यात येऊन त्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा पुरविण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा व दुधाळ देशी गायी म्हशींचे वाटप या दोन घटकांसाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठी समितीने दिलेल्या निर्देशानुसार प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. याला मान्यता मिळाली असून, योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी पशुपालकांना त्यांच्या पशूंसाठी शासनाकडून मोफत संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. या दोन्हीही योजनांकरिता शासनाने ४५.४४ कोटी रुपयांची वित्तीय मान्यतादेखील डिसेंबर २०१८ या वर्षात दिली आहे. या योजनेचा फायदा मराठवाडा व विदर्भात दुग्धउत्पादन वाढण्यासाठी होणार असून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.