माझी कृषी योजना : मासिक चर्चासत्र कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:20 PM2018-12-28T12:20:10+5:302018-12-28T12:20:55+5:30
कृषी विद्यापीठातील संशोधनाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व्हावा यासाठी चर्चासत्र
कृषी विद्यापीठातील संशोधनाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व्हावा, तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत पीक परिस्थितीची पाहणी करून त्वरित रोग नियंत्रण व कीडनियंत्रणाबाबत संदेश निर्मिती केली जावी. या संदेशाचे कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसारण करण्याच्या हेतूने जिल्हा मासिक चर्चासत्र कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये माहे जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान राबविण्यात येतो.
या कार्यक्रमात सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व कृषी संलग्न इतर विभागांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन तालुक्यातील पीक परिस्थितीवर चर्चा करणे, पिकांवरील कीड व रोग परिस्थितीवर पर्याय शोधणे, कृषी विद्यापीठातील नवसंशोधित तंत्रज्ञानावर चर्चा करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटींचे आयोजन करून, त्या अनुषंगाने चर्चा केली जाते. या चर्चासत्रांची फलनिष्पत्ती जाणून घेण्यासाठी शासनाने यापूर्वी मूल्यमापन केलेले आहे. मासिक चर्चासत्र कार्यक्रमाचा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.