'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:38 AM2024-05-02T10:38:13+5:302024-05-02T10:38:57+5:30
Uday Samant Vs Kiran Samant: धुसफुस असेल किंवा नसेल तर आम्ही बसून सोडवू - उदय सामंत
लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी उदय सामंत यांच्याकडून म्हणावा तसा प्रयत्न झाला नाही. यामुळे हे तिकीट भाजपाच्या नारायण राणेंना देण्यात आले, यावरून नाराज होत किरण सामंत यांनी बुधवारी मंत्री उदय सामंत यांचे कार्यालयावरील फोटो, बॅनर काढून टाकल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली होती. यावर किरण सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे.
किरणने माझा फोटो, बॅनर जरी काढला असेल तरी त्यांचा तरी फोटो आहे. शिंदे, बाळासाहेबांचा फोटो आहे. आम्ही दोघेही भाऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. ज्यांना मी आदर्श मानतो, आनंद दिघे यांचाही फोटो आहे. मोठ्या भावाच्या कार्यालयात त्याचा फोटो लागला तर त्यात दुःख असण्याचे कारण नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
तसेच मोठ्या भावाचे मन दुखावले असेल तर त्याची समजूत काढली पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी त्यात तेल ओतण्याची आवश्यकता नाही. लहान भावाचा फोटो काढून मोठ्या भावाचा लावला असेल त्यात मला आनंद आहे. मोठ्या भावाच्या फोटोत मी माझं प्रतिबिंब पाहतो. जर धुसफुस असेल किंवा नसेल तर आम्ही बसून सोडवू. त्यांना उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख असणे स्वाभाविक आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे किरण सामंत नाराज आहेत आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत किरण सामंत यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या कृतीतून किरण सामंत स्वतंत्र वाटचालीचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार सुरळीत सुरू आहे किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. मात्र तरीही सर्व काही आलबेल नसल्याचा मुद्दा आता पुन्हा पुढे आला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेटसही चर्चेत आले आहे. वेळेला जो उपयोगी पडतो तो आपला, असे त्यांनी स्टेटसमध्ये पोस्ट केले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनी दुपारी त्यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेला एक बॅनर हटवण्यात आला. त्यावर मंत्री उदय सामंत यांचा फोटो होता. त्या पाठोपाठ कार्यालयाच्या दर्शनी काचेवर लावण्यात आलेला उदय सामंत यांचा फोटोही काढण्यात आला आहे.