नशामुक्तीसाठी माझा बुलडोझर - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:06 AM2024-06-30T06:06:12+5:302024-06-30T06:06:37+5:30
अनधिकृत पब्ज, हॉटेल्स थेट पाडून टाकण्याचे आदेश आम्ही दिल्याने राज्यातील अनेक अनधिकृत बांधकामे बुलडोझरने तोडली गेली आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. महायुती सरकार सत्तेवर आले. आमच्यासमोर अनेक आव्हाने होती. पूर्वीच्या सरकारच्या मर्यादांमुळे या आव्हानांवर मार्ग काढणे गरजेचे होते. आज तरुणांची पिढी मादक द्रव्यांच्या आहारी जाऊ नये, यासाठी काही निर्णय धडाक्याने घेणे आवश्यक होते. ते आम्ही घेतले आहेत आणि ‘ड्रग्ज फ्री’ महाराष्ट्राकडे आपली आश्वासक वाटचाल सुरू आहे.
का गोष्टीमुळे मी खूप अस्वस्थ होतोय, ते म्हणजे अमली पदार्थांचा वापर करणाऱ्या तरुण-तरुणींची वाढती संख्या. ड्रग्जचा राक्षस वेळीच रोखला नाही, तर तो फार मोठ्या संकटात टाकू शकतो याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे; पण याचा मुकाबला खूप नियोजनबद्धपणे करावा लागणार आहे. यावर मी गेल्या वर्षी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत काही बैठका घेऊन सविस्तर चर्चाही केली आहे.
काही दिवसांपूर्वीपासून आम्ही ड्रग्जविरोधात धडाक्याने मोहीम हाती घेतली आहे, ते सर्वांसमोरच आहे. अनधिकृत पब्ज, हॉटेल्स थेट पाडून टाकण्याचे आदेश आम्ही दिल्याने राज्यातील अनेक अनधिकृत बांधकामे बुलडोझरने तोडली गेली आहेत. ड्रग्जपुरवठा करण्यावर यामुळे निश्चितच आळा बसणार आहे.
मुळात किशोरवयीन मुले अज्ञानाअभावी ड्रग्जच्या चिखलात अडकली आहेत, यात काही शंकाच नाही. त्यांच्या आरोग्यावर आणि करिअरवर याचा खोलवर परिणाम होत आहे. एकीकडे त्यांचे हे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करीत आहोत आणि दुसरीकडे याचा व्यापार उद्ध्वस्त करणे अशा दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे. यापासून कायमची मुक्ती मिळवायची असेल, तर जाणीवपूर्वक विविध आघाड्यांवर काम करावे लागेल हे माझ्या लक्षात आले. किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि तस्करी रोखणे हा यातला महत्त्वाचा भाग आहे. आज जगभरात अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू आहे. त्यातून लोकांना दारूमुळे होणाऱ्या हानीची जाणीव होते. ड्रग्ज आणि अवैध तस्करी रोखण्यासाठी भारतातही कडक कायदे आहेत. मात्र, लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.
गेल्या वर्षीच मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले. अमली पदार्थ विभागाने ड्रग्जमाफियांवर काय कारवाई केली तेही मी पाहिले. पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्वत्रच राज्य
उत्पादन शुल्कची भरारी पथके फिरताहेत. त्यांची विशेष तपासणी मोहीम काटेकोरपणे राबविणे सुरू आहे. कारवाईबाबत बोलायचे तर एप्रिलअखेर ६,७६१ गुन्हे दाखल झाले आहेत आणि अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ५,७४५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. १,०१६ ठिकाणी सुमारे ४ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
संपूर्ण शहरात ड्रग्जशी संबंधित अनेक गुन्हे दाखल झाले आणि मुंबई पोलिसांनी तर वर्षभरात ४,८०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे अमली पदार्थ नष्टही केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नालासोपारा आणि गुजरात येथील एमडी या अमली पदार्थाची निर्मिती करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कवठेमहांकाळ तालुक्यात एमडी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून १५० कोटींहून अधिक किमतीचा एमडी अमली पदार्थ जप्त केला. गेल्या महिन्यात नवी मुंबईत पोलिसांच्या कारवाईत तब्बल ३६ लाख २० हजारांचे विविध अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही निश्चितच चांगली कारवाई झाली; पण आपल्याला थांबून चालणार नाही. बेकायदा अमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिस विभागाला मी कायम सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुंबईतील सुमारे ७ हजार शिक्षकांना जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. हे प्रयत्न निश्चितपणे प्रभावी ठरतील, असे मला वाटते.
विविध प्रकारचे अमली पदार्थ मिळणे सोपे होत आहे, हे चिंताजनक आहे. पानटपऱ्या, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स हे यांचे प्रमुख विक्रेते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावरही लक्ष केंद्रित केले. मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्या वतीने अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयाजवळील पानटपऱ्यांवर कारवाई करून त्या हटविण्यात आल्या आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी कारवाई करण्यात आली. पदपथावरील हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील हॉकर्सविरुद्धदेखील मोहीम उघडली. या मोहिमा न थांबवता शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम घेण्यास मी सांगितले आहे.
अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. अमली पदार्थांचा पुरवठा रोखला पाहिजे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येत आहे. अमली पदार्थमुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का? याबाबत दक्ष राहून कारवाई करण्यात येत आहे. जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क हे विभाग आता पुढे सरसावले आहेत.
ड्रग्ज फ्री होण्यासाठी नागरिक म्हणून आपणसुद्धा चौकस राहिले पाहिजे. आजूबाजूला आपल्या वसाहतीत, कॉलनीत, परिसरात यासंदर्भात जागरूक राहून काही संशयास्पद वाटले किंवा अचानक काही मुले व्यसन करताना आढळून आली तर पोलिसांना सांगितले पाहिजे. ही एक लोकचळवळ व्हावी, अशी माझी इच्छा आहे; पण, केवळ सरकार किंवा पोलिस यात सर्वकाही करतील असे होऊ नये. जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका महत्त्वाची आहे. अमली पदार्थविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप दिले तर ती खूप परिणामकारक होईल, याची मला खात्री आहे. राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला अधिक मजबूत करणे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. राज्य शासन यात पुढाकार घेईल आणि एखादी परिणामकारक, नावीन्यपूर्ण योजना यासाठी आणली जाईल. या दृष्टीने नजीकच्या काळात निश्चितपणे पावले उचलली जातील.