"'मातोश्री'वर बैठक, तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:49 PM2024-12-03T12:49:19+5:302024-12-03T12:50:41+5:30
रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली.
बुलढाणा - महाविकास आघाडीसोबत जावं ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. माझं तिकीट फायनल झालं होतं ही खरी गोष्ट आहे. त्या अनुषंगाने आमच्या बैठका झाल्या. उद्धव ठाकरेंसोबत ५-६ बैठका झाल्या. आम्ही त्यांच्यासोबत यावं ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही इच्छा होती. मविआत जाण्यासाठी काँग्रेस, शरद पवारांसोबत मिटिंग झाली, उद्धव ठाकरेंसोबत जास्त मिटिंग झाल्या. माझी उमेदवारी फायनल झाली परंतु अचानक उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असा गौप्यस्फोट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
रविकांत तुपकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून फायनल होती परंतु प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांनी खेळी करून तुपकरांचे तिकीट कापले. अनिल परब आणि नार्वेकरांसोबत त्यांची बैठक झाली होती असा दावा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यावरून रविकांत तुपकरांनी चर्चेवेळी काय घडले त्याचा खुलासा केला आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, आमच्या शेवटच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, तेजस ठाकरे, विनायक राऊत, मी आणि उबाठाचे जिल्हाप्रमुख होते. रविकांतला तिकीट द्यायचं ठरलं, मला सांगण्यात आले, तुम्ही गावाकडे जा, कार्यकर्त्यांची बैठक घ्या त्यांच्यासमोर घोषणा करा. त्यानंतर मातोश्रीवर या, आपण संयुक्तिकपणे शेतकरी संघटनेचे आणि शिवसेनेची युती झाल्याचं जाहीर करू. एबी फॉर्म मात्र तुम्ही आमचा घ्यायचा हे ठरले. मी गावाकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी मला दिलेला शब्द अचानक उद्धव ठाकरेंनी फिरवला असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच मला उमेदवारी मिळू नये यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षातील लोक कामाला लावले. माझ्याबद्दल प्रतापराव जाधवांना रागच आहे. २०१९ ला मी त्यांच्याविरोधात प्रचार केला. आताची निवडणूक मी त्यांच्याविरोधात लढलोय. त्यांच्या मनात राग असणं स्वाभाविक आहे. त्यांनी काहींना मातोश्रीला पाठवले. त्यानंतर मला दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी फिरवला गेला. मला सांगितले, महाविकास आघाडीला पाठिंब्याची घोषणा करू नका. तुमची बैठक रद्द करा. मी म्हटलं, बैठक रद्द होऊ शकत नाही. २७ जिल्ह्यातील लोकांना बोलावलंय, मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी मातोश्रीला बोलावले. आमचे पदाधिकारी राजीनामा देण्याची भाषा करतायेत वैगेरे कारणे दिली. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदारही यात होते, ज्यांनी माझी उमेदवारी नको होती. रविकांत तुपकर नको यासाठी पक्ष सोडून काही जण एकत्र आले. असुरक्षेच्या भावनेतून माझं तिकीट कापण्यात आले. त्याचा आसुरी आनंद काहींनी घेतला. पैशाचं माहिती नाही, परंतु संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली.
संजय गायकवाडांनी काय दावा केला होता?
रविकांत तुपकरांचा एबी फॉर्म तयार होता, परंतु बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर १० खोके पोहचवले आणि त्याचा पत्ता कट झाला असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. त्यावरून रविकांत तुपकरांनी हा खुलासा केला आहे.