कडाक्याच्या थंडीत ‘माय’ उघड्यावर!
By admin | Published: January 7, 2015 12:57 AM2015-01-07T00:57:36+5:302015-01-07T00:57:36+5:30
पोटच्या गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आयुष्याच्या सायंकाळी तो आपल्याला असाच जपेल, अशी भाबडी आशा होती. मात्र या पोटच्या गोळ्याने आईला कामाच्या निमित्ताने यवतमाळात
पाईपचा आधार : महिनाभरापूर्वी मुलाने दिले बेवारस सोडून
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
पोटच्या गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आयुष्याच्या सायंकाळी तो आपल्याला असाच जपेल, अशी भाबडी आशा होती. मात्र या पोटच्या गोळ्याने आईला कामाच्या निमित्ताने यवतमाळात आणून बेवारस सोडून दिले. तो यायचे नाव घेत नाही. कडाक्याच्या थंंडीत ही ‘माय’ आता एका सिमेंट पाईपच्या आश्रयाला आहे. डोळ्यात प्राण आणून माऊली मुलाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र निर्दयी मुलगा अद्यापही फिरकला नाही.
दारव्हा मार्गावर उद्योग भवनासमोर असलेल्या मैदानात एक सिमेंटचा पाईप गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. हा पाईपच आता ‘त्या’ वृद्धेचा आधार झाला आहे. कडाक्याच्या थंडीत दोन गोधड्या आणि एक बकेट घेऊन तिने मुक्काम ठोकला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याकडे भिरभिरत्या नजरेने पाहत ती त्यांच्यात आपला मुलगा शोधत आहे. या दुर्दैवी मातेचे नाव आहे विमलबाई कवडधरे. नागपूर जिल्ह्यातील कोरपना गावची असल्याचे ती सांगते. तिला तीन मुले आणि चार मुली आहे. परंतु तिचा कुणीही सांभाळ करीत नाही. महिनाभरापूर्वी ती यवतमाळात कामाच्या शोधात आलेल्या मुलासोबत आली होती. एका आॅटोमोबाईल दुकानाच्या बाहेर अडगळीत हे दोघे राहत होते. मात्र एक दिवस मुलगा कुठे तरी निघून गेला. विमलाबाई एकटीच राहिली. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढला. वृद्ध शरीर थंडीचा कडाका सहन करू शकले नाही. अशा परिस्थितीत या माऊलीने मैदानातील एका पाईपचा आधार घेतला. या पाईपमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून ती मुक्कामी आहे. आपला मुलगा येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, अशी तिची आशा आहे. ती येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहते. मात्र मुलगा अद्याप तरी तिच्यापर्यंत आला नाही. एक वृद्धा पाईपमध्ये राहत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. तिची आस्थेने चौकशी करीत तिच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या अन्नावरच विमलबाई सध्या दिवस काढत आहे. विमलबाईसाठी परके धावून आले. मात्र पोटचा गोळा अद्यापही आला नाही. नेमका हा काय प्रकार आहे, हे तिलाही सांगता येत नाही. लिहिता-वाचता येत नाही. नेमके गावाचे नावही बरोबर सांगत नाही. घाबरलेल्या चेहऱ्याने ती काहीतरी बडबडते. या माऊलीला मायेची ऊब देण्यासाठी यवतमाळातील दानशूर निश्चितच पुढे येतील, अशी आशा आहे.