माझा रोजचा फादर्स डे!

By admin | Published: June 19, 2016 10:03 AM2016-06-19T10:03:53+5:302016-06-19T20:40:23+5:30

आई हे देवाचं दुसरं नाव असेल, तर बाबा हे काही दानवाचं नाव नाही. तेही देवाचंच आणखीन एक नाव आहे. 'बाप' या माणसाला काही वेळा कठोर व्हावं लागतं.

My Daily Father's Day! | माझा रोजचा फादर्स डे!

माझा रोजचा फादर्स डे!

Next
style="text-align: justify;">
द्वारकानाथ संझगिरी 
 
आज फादर्स डे अर्थात पितृदिन. आजच्या दिवशी वडिलांची आठवण प्रकर्षाने होते ती अनेक कारणांनी. वडिलांच्या स्वभावछटांचा वेध घेणारा 'तानापिहिनिपाजा' पुस्तकातील हा लेख संक्षिप्त रूपात आज फादर्स डे निमित्त शेअर करत आहे. 
 
आई हे देवाचं दुसरं नाव असेल, तर बाबा हे काही दानवाचं नाव नाही. तेही देवाचंच आणखीन एक नाव आहे. 'बाप' या माणसाला काही वेळा कठोर व्हावं लागतं. पण मग देव नाही होत का कठोर? मी माझ्या आजोबांच्या पिढीपासून वडील हे व्यक्तिमत्व पाहतोय आणि मला असं जाणवलंय की, आई ही गोड द्राक्षासारखी असेल म्हणजे सालापासूनच गोडवा सुरू होतो, तर वडील हे फणसासारखे असतात. बाहेरून काटेरी, पण आतून अत्यंत गोड! खरंतर सीताफळासारखं म्हणूया. सीताफळाचा गोडवा वेगळाच असतो. 
 
माझ्या पिढीमध्ये वडिलांना बाप, कवळ्या, हिटलर वगैरे म्हणणारेही मला भेटले, वडिलांना तुच्छतेने एकेरी नावाने संबोधणारेही भेटले. पण माझे आणि वडिलांचे अनेक मतभेद असून, त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा दबाव डोक्यावर घेऊनही मला माझे पपा, माझ्या आईइतकेच प्रेमळ वाटले. जसं डोळ्यांच्या बाबतीत डावं-उजवं नाही करता येत, तसं माझ्या आई-वडिलांच्या बाबतीतही नाही करता येत. माझे पपा जाऊन आज बरीच वर्ष झाली, पण अशा फार क्वचित रात्री असतात, जेव्हा ते स्वप्नात येत नाहीत. इतकं त्यांनी माझं अंतर्मन अजून व्यापलंय. 
 
माझ्या वयाच्या २३व्या वर्षापर्यंत त्यांची साथ मला लाभली. माझ्या आधीची पिढी तेवढी क्वचित नशीबवान होती. तेव्हा भारतीयांचं आयुर्मान कमी असल्यानं त्या पिढीत कोणाला सावत्र आई असे, कोणाला वडील नसत. (आजही सावत्र आया किंवा वडील असतात, पण त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण वाढलेली लाइफ एक्स्पेक्टन्सी नाही, तर वाढलेली सेक्स एक्स्पेक्टन्सी आहे.)
 
माझ्या पिढीत सावत्र आई असलेले मित्र किंवा वडील अकाली गेलेले माझे मित्र तसे कमी होते. पण आम्ही सर्वच टिपिकल मध्यमवर्गीय होतो. शाळेच्या मित्रांमध्ये त्या काळात स्वतःची गाडी असणारे एखाद-दोन मित्र. बाकी बरेचसे घरची रद्दी विकल्यावर मिळणाऱ्या पैशालाही 'आमदनी' समजणारे. खाऊनपिऊन सुखी. (पिऊन मध्ये अर्थात लिंबू सरबत, पन्हं, ऊसाचा रस, अधूनमधून कोक किंवा ऑरेंज. बीअरची बाटली इंद्राच्या दरबारातल्या उर्वशी एवढी दूरची वाटायची) खाऊनमध्ये अर्थात घरचं खाणं आलं. त्यात आम्ही 'सारस्वत' (जिभेने) असल्यामुळे आठवड्यातून तीनदा मासळी आणि रविवारी मटण-पुरी खाऊन सुखी होतो. शाळेत असताना आमच्या वर्गातली एका हाताच्या बोटांवर मोजता येणारी मुलं सोडली, तर दुपारी फेरीवाल्याकडे आम्ही फार काही खाल्लेलं आठवत नाही. युनिफोर्मच्या दोन-तीन जोड्या. वाढत्या वयामुळे शरीरात होणाऱ्या बदलानुसार फक्त कपडे बदलायचे. हे सर्व मध्यमवर्गीय घरांत होते. पण तिथे सर्वात महत्त्वाची होती ती अभ्यासाची संस्कृती! लहानपणी वडिलांच्या स्वभावाचे काटे त्याबाबतीत जाणवायचे . मोठं झाल्यावर मला त्या बाबतीतली वडिलांची कळकळ कळली. 
 
माझ्या वडिलांना शिकायची प्रचंड हौस होती. पण बेचाळीसच्या चळवळीत माझ्या आजोबांची नोकरी गेली. माझे वडील थोरले. त्यांच्या पाठचे दोन भाऊ. त्यामुळे घरचा रथ हाकून भावंडांना शिकवायची जबाबदारी त्यांनी शिरावर घेतली. त्यासाठी कॉलेज सोडावं लागलं. नोकरी करता करता शिकण्याची सोय त्यावेळी नव्हती. त्यांना त्यामुळे डिग्री घेता आली नाही. डिग्री नसण्याचाआणखी एक तोटा त्यांना नोकरीत कळला. त्यांनी ज्या जाहिरातीच्या कंपनीत नोकरीला सुरुवात केली, त्याच कंपनीतून ते निवृत्त झाले. जवळपास ४२ वर्षे त्यांनी एकाच कंपनीत नोकरी केली. त्यांच्याकडे डिग्री असती तर ते कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून निवृत्त झाले असते. पण डिग्री नसल्यामुळे एका विभागाचे प्रमुख यापलीकडे त्यांना जाता आले नाही. तो सल त्यांच्या मनात प्रचंड होता. त्यामुळे साहजिकच त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा भार मला वहावा लागला आणि तो वाहताना माझ्या इतर आवडी-निवडींना मला एकतर मुरड घालावी लागली किंवा त्या चोरून कराव्या लागल्या. मी बऱ्याचदा क्रिकेट चोरून खेळलो. सिनेमे तर सगळेच चोरून पहिले. रेडिओवर गाणी ऐकताना माझ्या वडिलांच्या कपाळावरील आठ्यांकडे पाहणं मी टाळलं. इंजिनियरिंगला असताना मी कॉलेजच्या नियतकालिकाचा संपादक आहे हे वडिलांपासून लपवून ठेवलं. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना मी मराठी वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी होतो, हे मी माझा इंजिनियरिंगचा निकाल लागून पहिला वर्ग मिळाल्यावर वडिलांना सांगितलं. त्यावेळी त्यांना नमस्कार करताना त्यांनी मला पाठीत एक धपाटा घातला आणि म्हंटलं, "हे वाङ्मय मंडळ वगैरे धंदे केले नसते, तर तुला डिस्टिंक्शन मिळालं असतं." शैक्षणिक डिग्री हा त्यांच्या दृष्टीने मोक्ष होता. त्यानंतर ते माझ्या मागे लागले, एकतर मास्टर्स इन इंजिनियरिंग कर, नाहीतर अमेरिकेला ट्राय कर. यातली एकही गोष्ट शक्य नव्हती, कारण मी इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना माझे वडील निवृत्त झाले. माझी धाकटी बहिण शाळेत होती आणि आमच्या घरात एकही कमावणारा माणूस नव्हता. तरीही माझे वडील आग्रह करायचे की मास्टर्स कर. "आम्ही अर्धपोटी राहू, पण तू शीक." हे ते कळकळीनं सांगायचे. 
हे शिक्षणासाठी आसुसलेपण होतंच. मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली नाही, तेव्हा आई आणि वडील दोघेही किमान आठ रात्री नीट झोपले नाहीत. मी तेव्हा दहा वर्षांचा होतो पण त्यांच्या डोळ्यांतली आसवं मला आजही आठवतात. मॅट्रिकचा निकाल इंडियन एक्स्प्रेसच्या प्रेस मधून काढल्यानंतर मी न मागता वरळीला मित्रांची गाडी थांबवून सर्वांना दिलेलं क्वालिटी आईसक्रीमही मला आठवतं. माझे वडील थोडेसे काटकसरी होते, पण त्यावेळी मला मिळालेल्या चौऱ्याहत्तर टक्क्यांनी (१९६७ साली) त्यांना समाधानी केलं होतं. दुसऱ्या दिवशी मार्कशीट हातात आल्यावर गणितात मला १०० पैकी ९६ गुण मिळालेले दिसले. आमच्या वर्गात पाचजणांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते. माझं गणित उत्तम, त्यामुळे माझ्या गेलेल्या चार मार्कांमुळे वडील पुढे चार महिने झोपले नाहीत. मी डाराडूर झोपलो. 
 
पुढे मी बाप झाल्यावर मागे वळून पाहताना वडिलांचं प्रेम, त्यांची माया, त्यांनी पोटाला घेतलेला चिमटा या गोष्टी मला जास्त आठवल्या आणि जाणवल्या व त्या काळी मी केलेल्या काही गोष्टींनी मी व्यथित झालो. त्यांना मी सिगरेट ओढलेली अजिबात आवडायचं नाही. पण त्यांनी कणकण वेचून जमवलेल्या पैशावर मी सिगरेट ओढली याचं पुढे मला जास्त दुःख झालं. काही वेळा एखाददोन सिनेमे पाहण्याच्या मोहपायी मी नवं पुस्तक विकलंय. या गोष्टी त्या वयात करताना मी हा सिनेमाचा क्षणिक आनंद लुटला. पण पुढे वडिलांना फसविल्याची जी भावना झाली, ती अपराधाची भावना आजही डोळ्यांत पाणी आणते. त्यामुळेच असेल, नोकरीला लागल्यानंतर मी 'श्रावणबाळ' झालो, ते  शेवटपर्यंत!
 
वडिलांचे काही गुण माझ्यात आले आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता. नातेवाईकांच्या बैठकीत ते चांगले बोलायचे. ते बऱ्याचदा इतरांना निरुत्तर करायचे. मी एकदा लहानपणी वडिलांना निरुत्तर केलं तेव्हा मात्र ते न चिडता खुश झाले होते. मी मोठं व्हावं या उद्देशाने ते नेहमी मला उदाहरणं देत. एकदा ते मला म्हणाले, "तुझ्या वयाचा असताना शिवाजीनं तोरणा किल्ला जिंकला होता, नाहीतर तू!" मी पटकन म्हंटलं, "पण पपा, तुमच्या वयाचा असताना शिवाजीचा राज्याभिषेक झाला होता." त्यांनी माझी पाठ थोपटली. माझे पपा पत्र सुंदर लिहित. त्यांना इतर महत्त्वाकांक्षा असत्या तर ते चांगले वक्ते आणि लेखक होऊ शकले असते, पण ते चांगले वडील झाले. 
-  'तानापिहिनिपाजा' पुस्तकातून घेतलेला संक्षिप्त लेख

Web Title: My Daily Father's Day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.