माझी मुलगी माझा अभिमान
By admin | Published: March 8, 2015 01:01 AM2015-03-08T01:01:59+5:302015-03-08T01:01:59+5:30
एकुलती एक मुलगी म्हणून लाड करणे हा विचार मी कधीच केला नाही. लहानपणापासून जान्हवीला मी काही तरी करीत राहण्याची प्रेरणा दिली.
शोभा धारिवाल, जान्हवी धारिवाल
एकुलती एक मुलगी म्हणून लाड करणे हा विचार मी कधीच केला नाही. लहानपणापासून जान्हवीला मी काही तरी करीत राहण्याची प्रेरणा दिली. कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये स्वत:ला सिद्ध कसे करता येईल, याचा विचार मी तिला दिला. त्यामुळे लहानपणापासूनच जान्हवी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत गेली. घरातील कौटुंबिक व्यावसायिक वातावरणामुळे जान्हवीने लहानपणापासूनच कुटुंबाच्या व्यवसायात येण्याचा निश्चय केला होता. शाळेमध्ये असणाऱ्या फनफेअरमध्ये तिची व्यावसायिक दृष्टीही दिसून येत होती. असे असले तरीही आम्ही तिला इतर कोणत्या क्षेत्रात जायचे असेल तर पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. वाणिज्य शाखेत तिने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एमबीए करावे, असे आम्हाला वाटत होते; पण तिने एक वाक्य उच्चारले ‘‘माझे वडीलच माझ्यासाठी विद्यापीठ आहेत. त्यांच्याकडून शिकवण घेत आली आहे.’’ या वाक्याने मी आणि माझे पती रसिकलाल धारीवाल गर्वान्वित झालो होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने कुटुंबाच्या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला आणि तोट्यात असलेल्या एका युनिटमध्ये काम करण्याचा तिने निर्णय घेतला. तेव्हा आम्हाला तिची खूप काळजी वाटत होती. पण कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या १० महिन्यांमध्ये तिने ते युनिट तोट्यातून नफ्यात आणले. तेव्हा माझी छाती गर्वाने फुलली होती. त्यानंतर तिने व्यवसायात मागे वळूनच पाहिले नाही. विविध उद्योगांमध्ये ती यश पादाक्रांत करत गेली आणि तिला जेव्हा गरज होती तेव्हा मी तिला साथ देत गेले. आमचे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू असते. त्या कार्यातही तिने भाग घेतला पण त्यातही तिने स्वत:च वेगळेपण निर्माण केले. जान्हवीला घडविताना अनेकदा कठोरपणाची भूमिका घ्यावी लागली; पण त्यामुळे तिचे जीवन बदलून गेले. आज जान्हवीला यशाच्या शिखरावर पाहताना मला तिचा अभिमान वाटतो.
आई नसती तर मी घडले नसते
आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळेच. ती नसती तर मी आज इथे नसते. लहानपणापासून कोणत्याही क्षेत्रात काम करताना रूटीनचे काम करू नकोस तर वेगळे कर हा तिचा सल्ला असायचा. जो मला माझे जीवन घडविण्यात खूप मोलाचा ठरला. तिने मला नेहमी प्रोत्साहित केले. मला माझ्या पायावर उभे करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. आई आणि बाबांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मी आज उद्योगात स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकले आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरविले.
- जान्हवी धारिवाल