'माझं 'ते' स्वप्न सत्यात उतरलं, पवारांचं सारथ्य करण्याचं भाग्य लाभलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 02:16 PM2018-11-28T14:16:11+5:302018-11-28T14:30:01+5:30
गौडगावमध्ये ज्या गाडीत शरद पवार बसणार होते, त्या गाडीची अगोदरच तपासणी करण्यात आली होती.
सोलापूर - आपल्या नेत्यासोबत आपला एक फोटो असावा, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा असते. जशी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासोबत फोटो घ्यावा, अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते. तशीच पवारांचे सारथ्य करता यावे, ही राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या ड्रायव्हरचीही इच्छा असते. बार्शीचे आमदारदिलीप सोपल यांच्या ड्रायव्हरनेही अशीच इच्छा उराशी बाळगली होती. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी ड्रायव्हर प्रताप पाटील यांनी एक स्वप्नही पाहिलं होत. पाटील यांचं ते स्वप्न आमदार सोपल यांच्या प्रेमामुळं अन् शरद पवार यांच्या बार्शी दौऱ्यानं पूर्ण झालं.
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे लोहकरे गुरुजींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार आले होते. त्यावेळी, बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने पवार यांच्या आदरातिथ्याचा मान साहजिक आमदार दिलीप सोपल यांच्याकडे होता. त्यामुळे पवार यांना त्यांच्या हॅलिपॅडपासून कार्यक्रमस्थळी आणण्याची व सोडण्याची जबाबदारी आमदार सोपल यांनी त्यांचे वाहनचालक प्रताप पाटील यांच्यावर सोपवली होती. पवार यांच्या दौऱ्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाटील हे आमदार सोपल यांच्यासमवेत गौडगावचा दौरा करत होते. त्यावेळी गौडगावच्या सरपंचांच्या घरी गेल्यानंतर चहा पिताना पाटील यांनी, साहेब मला चहा नको पण पवार साहेबांना ने-आण करण्याचं काम द्या, अशी विनंती केली. त्यावर, सोपल यांनीही पाटलांना ग्रीन सिग्नल दिला.
गौडगावमध्ये ज्या गाडीत शरद पवार बसणार होते, त्या गाडीची अगोदरच तपासणी करण्यात आली होती. तर पवारसाहेबांच सारथ्य करण्याची जबाबदारी मिळाल्याने वाहनचालक प्रताप पाटील अत्यंत खुश होते. पण, सांगोल्याचे माजी आमदार दिपक साळुंके यांना पाहून प्रताप पाटील काहीसे नाराज झाले. कारण, पवारांच्या सोलापूर दौऱ्यात दिपक साळुंके हेच पवारांच्या गाडीचे सारथ्य करतात. आता, पवार साहेबांचं सारथ्य साळुंके आबा करणार अन् माझी संधी हुकणार अशी शंका पाटील यांच्या मनात आली. त्यामुळे पाटील यांनी आमदार सोपल यांना फोन लावून याबाबत कळवले. त्यावर, आमदार सोपल यांनी तू काळजी करू नकोस गाडी तूच चालवायची असं म्हणून पाटील यांचा उत्साह वाढवला.
अखेर, हॅलिपॅडवर उतरल्यानंतर प्रताप पाटील यांच्या गाडीत शरद पवार बसले. त्या गाडीत पवार यांच्यासमवेत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार दिपक साळुंके हेही होते. अनेक दिवसांपासूनची आपली इच्छा आणि स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आता प्रताप पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो आनंद सेल्फीत कैद तर व्हायलाच पाहिजे ना. कारण, ''आपल्या साहेबांच्या साहेबांचा वाहक बनण्याचं अन् आपल्या नेत्याच्या नेत्याचं सारथ्य करण्याचं भाग्य पाटील यांना लाभलं होतं''. साहजिकच, पाटील यांनी शरद पवारांकडे सेल्फी घेण्याचा अन् माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं बोलून दाखवलं.
पवार यांनी तुमच नाव काय? असा प्रश्न पाटील यांना केला. त्यावर, साहेब माझं नाव पाटील अन् मी गेल्या 14 वर्षांपासून सोपल साहेबांकडे आहे. तुमचा गामा ड्रायव्हर माझा चांगला दोस्त आहे, असेही पाटील यांनी सांगितलं. त्यावर, आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत आमदार सोपल यांनी कोपरखळी मारलीच, अरे तुझं प्रोफाईल कशाला सांगतो साहेबांना, उद्या साहेब त्यांच्यासोबत तुला घेऊन गेले म्हणजे आली न माझी पंचाईत असं सोपल यांनी म्हणताच, एकच हशा पिकला.
पवार साहेबांचे सारथ्य करण्याचं भाग्य लाभल्यानं 'आज माझं स्वप्न पूर्ण झालं. मी यापूर्वी आर.आर. आबा, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं. पण, दस्तुरखुद्द पवारसाहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याची माझी इच्छा होती. ''खोटं बोलत नाही, आई-तुळजाभवानी अन् येडाईची शप्पथ घेऊन सांगतो, मला दोन वर्षांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. त्यामध्ये, मी पवारसाहेबांना घेऊन गाडी चालवत होतो. गाडी चालवताना सोपलसाहेबांनी पाठीमागून मला हाटकलं, अरे काश्या गाडी जरा हळू चालव ना, त्यावर पवार साहेबांनी सोपलसाहेबांना प्रश्न केला, यांचं नाव काश्या आहे का ?. उत्तरादाखल नाही, त्याचं नाव प्रताप पाटील आहे, मी त्याला लाडानं काश्या तर दुसऱ्या ड्रायव्हरला म्हाट्या म्हणतो, असे सोपल यांनी म्हटल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला. आज, दोन वर्षांनी साक्षात पवारसाहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभल्यानं मी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं, माझं स्वप्न पूर्ण झालं, अशी भावना पाटील यांनी लोकमतशी बोलून दाखवली.