‘मंगेश पाडगावकरांमुळेच माझे अस्तित्व’!

By admin | Published: December 31, 2015 04:16 AM2015-12-31T04:16:57+5:302015-12-31T04:16:57+5:30

अरुण दाते हे अस्तित्वच मुळी मंगेश पाडगावकरांमुळे आहे. गायक म्हणून मी माझी ओळख त्यांना समर्पित करतो. पाडगावकर आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे.

'My existence because of Mangesh Padgaonkar'! | ‘मंगेश पाडगावकरांमुळेच माझे अस्तित्व’!

‘मंगेश पाडगावकरांमुळेच माझे अस्तित्व’!

Next

- अरुण दाते

अरुण दाते हे अस्तित्वच मुळी मंगेश पाडगावकरांमुळे आहे. गायक म्हणून मी माझी ओळख त्यांना समर्पित करतो. पाडगावकर आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. या क्षणाला मनात कोलाहल सुरू आहे, बुद्धी आणि मन एकमेकांशी भांडत. ‘गुरू’..‘वडील’..आणि जगायला शिकवणारं ‘विद्यापीठ’ या सर्व संज्ञांच्या पलीकडे आमचं नातं होतं. पाडगावकरांनी मला घडवलंय, त्यांच्याशिवाय पाऊल पुढे टाकणं हा विचारही मन हेलावून टाकणारा आहे.
संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत पाडगावकर कायम माझ्यासोबत सावलीसारखे राहिले, त्यासाठी मी कृतज्ञ आहे.
‘शुक्रतारा... मंदवारा’ हे पाडगावकरांसोबत केलेलं पहिल गाणं. पाडगावकरांच्या शब्दांविषयी मी बोलणं उचित ठरणार नाही. मात्र, ही गाणी इतकी प्रसिद्ध होण्यामागे मंगेश पाडगावकरांची कविता हे मूळ कारण आहे. पाडगावकरांच्या शब्दसामर्थ्यामुळे गाण्यांना जिवंतपणा आला. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही आणि त्यांच्यासारखा कवी साहित्य क्षेत्रात पुन्हा कधीच होणे नाही, हेही तितकेच खरे आहे. ‘या जन्मावर...या जगण्यावर’ हे गाणं करतानाचा एक वेगळाच अनुभव आहे. एका रात्री उशिरा पाडगावकरांचा फोन आला आणि एक कविता ऐकवायची आहे, असे म्हणून पाडगावकरांनी ‘या जन्मावर...या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही संपूर्ण कविता फोनवर ऐकविली. यशवंत देव यांनाही कविता ऐकवलीये, असे म्हणून कवितेला चाल लावं, असे त्यांनी सांगितले आणि रात्री उशिरा फोन केल्याबद्दल ते म्हणाले होते की, ‘पानावरची शाई वाळण्याआधी कविता ऐकवायची’ होती, म्हणून आवर्जून फोन केला. मी पाडगावकरांसोबत ६०-७० कार्यक्रम एकत्र केले, पण पाडगावकरांच्या शब्दसामर्थ्यामुळेच हे कार्यक्रम रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवित आहेत. यशवंत देव आणि पाडगावकरांची यांची भेट दसऱ्याच्या दिवशी झाली होती. त्या दिवशी मनमोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आता या क्षणीही ते ‘होते’ असे म्हणायला मन धजावत नाहीये, अजूनही विश्वास बसत नाहीये.
(शब्दांकन : स्नेहा मोरे)

Web Title: 'My existence because of Mangesh Padgaonkar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.