माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:23 PM2022-09-22T16:23:34+5:302022-09-22T16:24:08+5:30

Chandrashekhar Bawankule : एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये, यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

My family is my responsibility, Uddhav Thackeray sees no one but his family - Chandrasekhar Bawankule | माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Next

नागपूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

गुरुवारी चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये, यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकापाठोपाठ एक चार ट्विट करून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

याचबरोबर, भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा. अमितभाईंवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलात शिवसेने गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटातील शिवसैनिकांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांवर सडकून टीका केली. भाजपमध्ये उपऱ्यांचा बाजार भरला आहे. त्यामुळे भाजपमध्ये ओरिजीनल कोण हेच कळत नाही. एवढे उपरे घेतले आहेत की तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Web Title: My family is my responsibility, Uddhav Thackeray sees no one but his family - Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.