'माझ्या सासऱ्यांना ह्रदयाचा त्रास, त्यांना काही झालं तर?'- क्रांती रेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:56 PM2021-10-28T19:56:34+5:302021-10-28T20:00:23+5:30
'आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विश्वास, त्यांना भेटून आमची बाजू मांडणार.'
मुंबई: आज अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि त्याचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) दिलासा दिणारा दिवस आहे. कोर्टाने आज आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करत आहेत. यानंतर आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर(Kranti Redkar)ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना क्रांती म्हणाली की, 'या सर्व प्रकरणावरुन होणारी वैयक्तिक टीकेला आळा बसायला हवा. या सर्व गोष्टी आता कुठे तरी थांबल्या पाहिजेत. एका मराठी माणसाला महाराष्ट्रात हे सर्व सहन करावं लागत असेल तर आम्ही कुठे जायचं. आम्ही कोणाकडे बघायचं ? उद्धव ठाकरेंवर माझा विश्वास आहे, ते नक्कीच योग्य न्याय करतील.'
माझ्या सासऱ्यांना काही झालं तर...?
आज माझ्या सासऱ्यांच वय 70 वर्षे आहे, त्यांना हृदयविकाराचा आजार आहे. त्यांची दोन वेळा हार्ट सर्जरी झालीय. उद्या जर त्यांना टेन्शनने काही झालं, तर आम्ही कुठे जायचं, कोणाकडे बघायचं? माझ्या नणंदेला लिवरचा आजार आहे. तिचे काही ना काही आरोग्याच्या तक्रारी आहेत. मलाही दोन मुली आहेत, त्या अद्याप तीन वर्षांच्याही झालेल्या नाहीत. हा लढा राजकीय नाही. हा एका आईचा, बायकोचा, बहिणीचा लढा आहे. आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. आता मला लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे, असं क्रांती म्हणाली.
नेमकं काय प्रकरण आहे?
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्ग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत.
ट्विटरवरुन नबाव मलिकांनी समीवर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला होता. यावरुन वानखेडे कुटुंब आणि नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.
आज अखेर आर्यन खानला जामीन मिळाला
गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर आज जामीन मिळाला आहे. त्याच्यासह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबईउच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.