योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असेल - सुजाता सौनिक

By यदू जोशी | Published: July 1, 2024 10:09 AM2024-07-01T10:09:15+5:302024-07-01T10:09:35+5:30

कुटुंबापासूनच प्रशासनाची ओळख होत गेली, पुढे त्यातच संधी मिळाली... वैभवशाली परंपरा समोर नेण्याचा, प्रशासन अधिक गतिमान करण्याचा असेल प्रामाणिक प्रयत्न...

My focus will be on delivering the scheme to the beneficiaries - Sujata Saunik | योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असेल - सुजाता सौनिक

योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असेल - सुजाता सौनिक

यदु जोशी 

मुंबई : महाराष्ट्राला अत्यंत आदर्श अशा प्रशासनाची प्रदीर्घ परंपरा आहे, या परंपरेची पाईक होण्याची संधी मला मिळाल्याचा अत्यानंद होत आहे. समाजातील विविध घटकांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ हा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्यावर माझा भर असेल, अशी भावना नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केली. 

मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी त्यांनी बातचित केली. महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल देशभर अत्यंत आदराने बोलले जाते. प्रशासनाची ही वैभवशाली परंपरा त्याच पद्धतीने समोर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्कीच करेन. प्रशासन संस्कृतीतच मी वाढले आहे. माझे बरेच नातेवाईक प्रशासकीय अधिकारी राहिले आहेत. माझे आजोबा नागपूरला रेल्वेचे मोठे अधिकारी होते. माझी मावशी आशा सिंग ही प्रशासनात ज्येष्ठ अधिकारी होती. दुसरी मावशी राणी जाधव या आयएएस अधिकारी होत्या. अनेक पदे त्यांनी भूषविली. पती मनोज सौनिक तर मुख्य सचिव राहिले. थोडक्यात मला कुटुंबापासूनच प्रशासनाची ओळख होत गेली आणि पुढे त्यातच संधी मिळाली. 

इतकी वर्षे प्रशासकीय कामकाज करताना आलेल्या अनुभवाचा आता मुख्य सचिव म्हणून महाराष्ट्राला फायदा करून देण्याचे मनात आहेच. महाराष्ट्राच्या प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे मला निश्चितपणे सहकार्य करतील, असा आपल्याला विश्वास असल्याचे सुजाता सौनिक म्हणाल्या.  

एकमेकांचा सन्मान
माझे पती मनोज सौनिक मुख्य सचिव झाले, आता मला ही संधी मिळाली आहे. खासगी आयुष्य आणि प्रशासकीय कर्तव्य या दोन्ही गोष्टींची आम्ही कधीही गल्लत होऊ दिली नाही. इतक्या वर्षांमध्ये एकमेकांच्या प्रशासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांनी मला माझ्या खात्याशी संबंधित कोणतेही काम कधी सांगितले नाही आणि मी देखील त्यांना तसे कधी म्हणाले नाही. खासगी आणि प्रशासकीय आयुष्यात एकमेकांचा सन्मान आम्ही नेहमीच केला आहे.  -सुजाता सौनिक, मुख्य सचिव 

कर्तव्यकठोर अधिकारी
मुख्य सचिवपदाची मला तर संधी मिळालीच; पण त्याहीपेक्षा पत्नीला आज संधी मिळाली याचा आनंद कितीतरी जास्त आहे. सुजाता कर्तव्यकठोर अधिकारी आहे आणि ती तेवढीच संवेदनशीलही आहे. तिच्या या स्वभावगुणांचा मुख्य सचिव म्हणून काम करताना तिला आणि महाराष्ट्रालाही निश्चितच फायदा होईल, असे मला वाटते.    -मनोज सौनिक, माजी मुख्य सचिव

Web Title: My focus will be on delivering the scheme to the beneficiaries - Sujata Saunik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.