‘हे न्हवं माझं सरकार!’ विरोधकांची बॅनरबाजीतून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:55 AM2017-12-11T04:55:52+5:302017-12-11T04:56:02+5:30
‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे. ‘हे न्हवं माझं सरकार’ या टॅगलाईनखाली गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कामाचे वाभाडे काढणारे बॅनर्स विरोधकांनी झळकविले आहेत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रविभवनातील कॉटेजच्या परिसरात एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले, याचा सचित्र आलेख मांडत सरकारला सवालही विचारण्यात आले आहेत. कर्जमाफी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यासारखे मुद्दे घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर फोकस करण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यांची खिल्लीही उडविण्यात आली आहे. सरकारने केलेली जाहिरातबाजी, सरकारच्या कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकºयांपर्यंत पोहचलेली नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासह ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाºयांना मिळते क्लीनचिट’ असे लिहून मंत्र्यांच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी विरोधक विधिमंडळावर जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानिमित्त शहरात लावण्यासाठी तयार
करण्यात आलेल्या बॅनरसंबंधित मुद्यांवर फोकस करण्यात आला आहे.
बॅनरवरील काही मुद्दे
भाजपाने निवडणुकीत दिला होता नारा, अजूनही झाला नाही सातबारा कोरा
सरकारच्या अन्यायाचा झाला कहर, जगाचा पोशिंदा रोज पितो जहर