'...त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालेलं', दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं, लोकेशन सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:13 PM2022-12-23T13:13:15+5:302022-12-23T13:14:25+5:30
ज्यादिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं हे आपल्या सर्वांना ठावूक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नागपूर-
दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जात असताना आता पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनीच दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आपण कुठे होतो याबद्दल भाष्य केलं आहे. ज्यादिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं हे आपल्या सर्वांना ठावूक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते नागपूरात विधानभवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली जातेय असं आदित्य यांना विचारलं असता त्यांनी पहिल्यांदाच आपण त्यादिवशी कुठं होतो याची माहिती दिली आहे. "दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. याची तुम्हालाही माहिती आहे. मी त्यादिवशी अर्थात तिथं होतो. मी सत्य बोलायची ताकद ठेवतो आणि हे सरकार अशाच लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. तुम्ही पाहिलं असेल की जितेंद्र आव्हाड असो किंवा संजय राऊत असो सत्याच्या बाजूनं उभं राहणाऱ्यांना त्रास दिला जातोय. उद्या तुम्हा पत्रकारांनाही सतावलं जाईल", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्हीच पट्टेरी वाघ, मिंधे सरकारचे पट्टे पुसले गेले
सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे प्रतिमेला डाग लागले जात आहेत असं विचारलं गेलं असता आदित्य ठाकरेंनी मिंधे सरकारचं मांजर झाल्याचं म्हटलं. "डाग वगैरे काही नाही. आम्ही पट्टेरी वाघ आहोत आणि मिंधे सरकारचे पट्टे पुसले गेले असून त्यांची मांजर झाली आहे. एका ३२ वर्षांच्या तरुण आमदाराला मिंधे सरकार घाबरलं आहे. मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर असून त्यांचा राजीनामा घेईपर्यंत लढत राहणार असा निर्धार आम्ही केला आहेठ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"