माझी इन्फ्रारेड फोटोग्राफी

By admin | Published: January 4, 2015 01:54 AM2015-01-04T01:54:13+5:302015-01-04T18:22:39+5:30

आनंदाचा केवळ आनंदापुरताच उपयोग न होता त्याचा पीडित-शोषितांनाही उपयोग झाला तर अर्थातच मला जास्त समाधान मिळेल. एक कर्तव्य म्हणून मी या प्रदर्शनाचा उपयोगदेखील करणार आहे.

My Infrared Photography | माझी इन्फ्रारेड फोटोग्राफी

माझी इन्फ्रारेड फोटोग्राफी

Next

अकरा वर्षांनंतर मी फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवत आहे. एक कलावंत म्हणून माझा छंद जोपासण्यासोबतच यातून मिळणाऱ्या आनंदाचा केवळ आनंदापुरताच उपयोग न होता त्याचा पीडित-शोषितांनाही उपयोग झाला तर अर्थातच मला जास्त समाधान मिळेल. एक कर्तव्य म्हणून मी या प्रदर्शनाचा उपयोगदेखील करणार आहे. यातील काही छायाचित्रे विक्रीसही खुली केली आहेत. या विक्रीतून जो निधी उभा राहील तो आमच्या सामाजिक संस्थेमार्फत राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरणार आहे.
यापूर्वी शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास जपणाऱ्या गडकिल्ल्यांची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारीची म्हणजेच पंढरपूर वारीची मी एरियल फोटोग्राफी केली आहे. ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पाहावा विठ्ठल’ अशी त्याची दोन पुस्तकेही आली आहेत. एरियल फोटोग्राफी करणे हा थोडा कठीण भाग आहे. कारण त्यांच्या परवानग्या अनेक असतात आणि त्या मिळवताना त्रास होतो. या वेळेला एक वेगळा प्रयत्न मी केलाय, तो म्हणजे इन्फ्रारेड फोटोग्राफीचा प्रयोग.
इन्फ्रारेड म्हणजे काय?
इन्फ्रारेड म्हणजे काय तर आपण नेहमी जो फोटो काढतो तेव्हा साधारण प्रकाश आपण कॅमेराबद्ध करतो आणि त्यामुळे छायाचित्र कॅमेरात बंदिस्त होत जाते. पण यामध्ये नॉर्मल लाइट ब्लॉक होतो आणि फक्त इन्फ्रारेड लाइट आतमध्ये येतो. ज्यामुळे आपल्याला दिसत नसलेला लाइट कॅमेरात प्रकाशचित्रित होतो आणि त्या फोटोची एक वेगळी नजाकत दृश्य स्वरूपात येते. ही प्रकाशचित्रे दिसायलाही वेगळी दिसतात, त्यांची रंगसंगती बदलते. काही वेगळे परिणाम त्या प्रकाशचित्रांतून आपल्याला पाहायला मिळतात.
इन्फ्रारेड फोटोग्राफीसाठी झाडे आणि पाणी असलेल्या जागा या सर्वोत्तम मानल्या जातात. याचे कारण झाडे जेवढी इन्फ्रारेड लाइट रिफलेक्ट करतात तेवढी कोणतीही दुसरी गोष्ट करू शकत नाही. पाण्यातीलही प्रतिबिंब छान दिसते. वातावरण, किरणांचा अ‍ॅग्नल, तापमान हे परिणामकारक असते. आकाशातले ढगही त्यात वेगळी मजा आणतात.
(लेखक शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत)

कंबोडियातील अंगकोरवाटची प्राचीन मंदिरे पाहताना आपली हिंदू संस्कृती किती प्राचीन होती ते जाणवते. गेली अनेक वर्षे ही मंदिर माझ्या कुतूहलाचा विषय होती आणि त्या कुतूहलापोटीच मी तेथे पोहोचलो. तेथील शिल्पकला ही पाहण्यासारखी आहे. त्यातली काही निवडक प्रकाशचित्रे मी या प्रदर्शनात ठेवली आहेत.

या प्रदर्शनातील सर्व फोटो निवडताना महाविद्यालयापासून माझे मित्र असलेल्या भुपाल रामनाथकर आणि संजय सुरे यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली. ते दोघेही कला दिग्दर्शक आहेत. त्यांना मी छायाचित्र निवडण्यापासून त्याची मांडणी करण्यापर्यंत जबाबदारी दिली होती.

या मंदिरांसारखाच एक आणखी वेगळा विषय आहे तो म्हणजे पोलर बेअर (हिम अस्वल). हादेखील एक आव्हानात्मक विषय आहे. मायनस २० अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या ठिकाणी ही हिम अस्वले सापडतात. जिथे बघावे तिथे चहूबाजूला बर्फच बर्फ. अगदी रोज साफ केला तरी बर्फ जमत असे.

कंबोडियात फिरताना आपल्या अंगावरसुद्धा भुरभुरत बर्फ पडतो. आम्ही जिथे राहिलो होतो ते फक्त २० खोल्या असलेले एक छोटे लाकडी घर होते. तिथे सगळ्यांनी आम्हाला सांगितले होते की, संध्याकाळी अजिबातच बाहेर फिरू नका. कारण पोलर बेअर त्या गावात येतात.
एखाद्या टेडी बेअरसारखा गोड असणारा हा पोलर बेअर प्राणी प्रत्यक्षात असतो मात्र हिंस्त्र. त्यांचे नाक हे अत्यंत तीक्ष्ण असते. साधारणत: जुलै ते नोव्हेंबर या काळात हा प्राणी जे मिळेल ते तो खातो. अगदी माणूस मिळाला तर त्यालाही खाऊ शकेल. यासाठी मानवी वस्तीतही शिरतो. आम्हालाही तो अनुभव आला. रात्री कसलासा आवाज येत होता म्हणून आम्ही डोकावण्याचा प्रयत्न केला पण काही दिसले नाही.

सकाळी जेव्हा चौकशी केली तेव्हा लोकांनी सांगितले की, पोलर बेअर येथे येऊन गेला. बाहेर पाहिले तेव्हा त्याने कचऱ्याचा डबा पूर्ण उद्ध्वस्त केला होता. जे मिळेल ते तो खायला पाहत होता. पोलर बेअर वस्तीत आला की त्याला लोक बंदुकीचा आवाज काढून पळवून लावतात.
तो पुन: पुन्हा आला तर ते त्याला पोलर बेअर जेलमध्ये टाकतात. हा एक गमतीशीर प्रकार पाहायला मिळाला. ज्या वेळेला इतर हिम अस्वले निसर्ग चक्राप्रमाणे खोलवर समुद्रात जातात त्या वेळेस या जेलमधील अस्वलांना हेलिकॉप्टरने उचलून इतर हिम अस्वलांमध्ये सोडतात.

एक फोटोग्राफर म्हणून इन्फ्रारेड फोटोग्राफी हा थोडा कुतूहलाचा विषय आहे. त्याचप्रमाणे पोलर बेअरची छायाचित्रे, अंगकोरवाट येथील प्राचीन हिंदू मंदिरांची छायाचित्रे आणि काही पोर्ट्रेट्स असे हे सगळे विविध विषय मी या छायाचित्रांच्या माध्यमातून हाताळत आहे.

याचे प्रदर्शन जहांगीर आर्ट्स गॅलरीमध्ये ६ ते १२ जानेवारी या कालावधीत आहे. उस्ताद झाकीर हुसेन या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. एकूण ६०-७० छायाचित्रांमधील ५० टक्के छायाचित्रे ही इन्फ्रारेड प्रकारातील आहेत.

उद्घव ठाकरे

Web Title: My Infrared Photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.