‘माझा मी’!

By admin | Published: April 8, 2017 11:58 PM2017-04-08T23:58:01+5:302017-04-08T23:58:01+5:30

‘मी’ असतो पूर्णविराम! ‘मी’पुढे काहीच नसते! ‘मी’ पाहू शकतो हिमालयाला, ब्रह्मांडाला! मग मोठा कोण? हिमालय की त्याला इवल्याशा तरी विशाल डोळ्यात साठवणारा मी?

'My mile'! | ‘माझा मी’!

‘माझा मी’!

Next

- डॉ. नीरज देव 

‘मी’ असतो पूर्णविराम! ‘मी’पुढे काहीच नसते! ‘मी’ पाहू शकतो हिमालयाला, ब्रह्मांडाला! मग मोठा कोण? हिमालय की त्याला इवल्याशा तरी विशाल डोळ्यात साठवणारा मी? मी पसरविलेल्या या रंगातच मी होतो बेभान! त्यामुळेच मी जपतो माझे ‘मी’पण!. मी’ जेव्हा ‘मी’पणात बदलतो तेव्हा ‘मी’ची बाधा झाली असे म्हणतात. ती बाधा जावी म्हणून तर, ‘अहंकाराचा वारा न लागो माझिया राजसा’ म्हणत ज्ञानदेव कळवळतात

माझा ‘मी’ कोणाला आवडत नाही बरे! ‘मी’चे हे आकर्षण पाहूनच की काय जगातील बहुतेक भाषांत ‘मी’साठीचे शब्द एकाक्षरीच सापडतात. अपवाद संस्कृत, कन्नडसारख्या एखाद - दुसऱ्या भाषेचा. पण त्याही भाषांत ‘मी’ असतो; प्रथम पुरुषी एकवचनी!
माझा ‘मी’ कसाही असला; सुंदर-कुरुप, काळा-गोरा, चांगला - वाईट तरी तो मला भावतोच. माझा मी मला आवडणं तसं नैसर्गिकच असतं म्हणा ना? साऱ्या जगाला पाहणारा व पाहता पाहता तपासणारा माझ्यातील तपासणीस माझ्या ‘मी’ला कधीच पाहू शकत नाही. कोणी म्हणेल असे कसे मी तर मला रोजच पाहतो आरशात, फोटोत. मला आवडते माझीच प्रतिमा बघायला. तशी ती कोणाला आवडत नाही?
पण काय म्हणालात ‘प्रतिमा’? आरशातील असो की फोटोतील आपल्याला भावणारी आपली प्रतिमा असते उलटी; जे आपण आहोत त्याच्या अगदी उलट दाखविणारी. त्यामुळेच असेल कदाचित माझे भले-बुरे, चांगले - वाईट कसेही वागणे माझे मला चांगलेच वाटत असते.
हा माझा ‘मी’ जेव्हा ‘मी’पणात बदलतो तेव्हा त्याला ‘मी’ची बाधा झाली असे म्हणतात. ती बाधा जावी म्हणून तर, ‘अहंकाराचा वारा न लागो माझिया राजसा’ म्हणत ज्ञानदेव कळवळतात तर ‘बंदे मत करना अभिमान कोई दिन निकल जायेगा प्रान’ची जाणीव कबीर करून देतात तरीही मीपणा काढणे कठीणच जाते. अगदी भाड्याने घेतलेला हा देहसुद्धा येथेच सोडून द्यावा लागत असला तरीही का कोण जाणे मी मारत सुटतो शिक्के; माझे - ‘मी’पणाचे!
असे काय असते बरे माझ्या ‘मी’त? नीट डोळे उघडून या सृष्टीकडे पाहिले तर या ब्रह्मांडात, आपली ही सूर्यमालिका टीचभर आणि या टीचभर सूर्यमालिकेत ही पृथ्वी कणभर! या हजारो हजार योजने व्यापलेल्या तरीही सूर्यमालिकेत कणभर असलेल्या आपल्या पृथ्वीत माझा ‘मी’ केवढा तर एका बिंदूएवढा!
काय म्हणालात बिंदू? बिंदू म्हणजे पूर्णविराम! होय; मला वाटते माझा प्रश्नच चुकला. काय नसते बरे या माझ्या या ‘मी’त? आत्मार्थे पृथ्वी त्यजेत्!
मी असतो पूर्णविराम! ‘मी’पुढे काहीच नसते! ‘मी’ पाहू शकतो हिमालयाला, ब्रह्मांडाला! मग मोठा कोण? हिमालय की त्याला इवल्याशा तरी विशाल डोळ्यात साठवणारा मी? मी लावतो माझेच रंग जगाला! मी पसरविलेल्या या रंगातच मी होतो बेभान! त्यामुळेच मी जपतो माझे ‘मी’पण! माझे घर, माझी मुले, माझा संसार, माझा देश, माझे जग, माझा देह अन् माझा देव! सारा काही ‘मी’ अन् माझाच पसारा! कारण ‘मी’ आहे पूर्णविराम!
खरे सांगायाचे तर या साऱ्या जगाचे अस्तित्व असते माझ्या असण्यावर! म्हणतात ना ‘आप मरे जग डुबा’ ते उगाच नाही. माझं प्रेम जगाला प्रेमळ बनविते, माझ्या डोळ्यांतील सुंदरता जगाला सुंदर बनविते. गुलाबाची सुंदरता गुलाबात नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. माझी दृष्टीच महत्त्वाची असते. आठवते का? युधिष्ठिराला ज्या सभेत एकही वाईट माणूस सापडला नाही त्याच सभेत दुर्योधनाला एकही सुजन गवसला नव्हता. हा धर्मराज व दुर्योधनाच्या ‘मी’चाच प्रभाव नव्हे तर काय?
सापडले! मला माझा ‘मी’ आवडण्याचे खरे कारण सापडले. मला जगाला बदलविता येत नाही; पण मला माझ्या ‘मी’ला बदलविता येते, त्याचा विकास करता येतो. बघा ना! सिद्धार्धाचा विकसित ‘मी’ वसुधैव कुटुंबकम्ची विशाल भावनाच व्यक्त करू लागतो तर ज्ञानदेवाचा ‘मी’ किंबहुना चराचर आपण जाहलाची सार्थ अनुभूतीच व्यक्तवितो. त्यासाठी गरज नसते कोणत्याही साधनांची वा उपचाराची! गरज असते ती फक्त ‘मी’ बदलावं असं वाटण्याची! त्यासाठी घडीभर स्वत:कडे तटस्थपणे पाहावे लागते अन् पाहताक्षणीच ध्यानात येते माझा ‘मी’ पूर्णविराम नसून अर्धविराम आहे; शेवट नसून आरंभ आहे. ‘अहम् ब्रह्माऽस्मि’च्या पूर्णविरामाचा!

(लेखक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

Web Title: 'My mile'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.