माझे मंत्रिपद कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे..!
By admin | Published: May 4, 2017 11:27 PM2017-05-04T23:27:40+5:302017-05-04T23:27:40+5:30
सदाभाऊंचा टोला; चळवळीमुळेच मिळाली सत्ता
कोल्हापूर : हा सदाभाऊ चळवळीच्या मुशीतून तयार झालेला नेता आहे. ओठांवर मिशी फुटली नव्हती तेव्हापासून चळवळीत आहे; परंतु मिशा फुटल्यावर चळवळीत आलेले काहीजण माझ्याबद्दल शंका घेत आहेत. मी शांत आहे याचा अर्थ कमजोर आहे असा नव्हे. या चळवळीने, तुम्ही शेतकऱ्यांनी मला घडवलं... तुम्हीच नेतृत्व दिलं आणि सत्तेत बसवलं. कुणाच्या मेहरबानीवर मला मंत्रिपद मिळालेले नाही, असा टोला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे लगावला. निमित्त होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या कर्जमुक्ती मोर्चाचे.
सदाभाऊ या मोर्चाला येणार की नाही, याबद्दल मोठी उत्सुकता होती. ते मोर्चाला आले नाहीत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेला उपस्थित राहिले व आपल्या मनातील सल बोलून दाखविली. त्यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे शेट्टी व त्यांच्यातील दरी चांगलीच रुंदावली असल्याचेही दिसले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी दसरा चौकातून दुपारी अडीच वाजता निघालेला हा मोर्चा सव्वातीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तिथे उपस्थित शेतकऱ्यांतही सदाभाऊ येणार का, हीच उत्सुकता होती. सदाभाऊ ४ वाजून १० मिनिटांनी तिथे आले. त्यावेळी टाळ्या व शिट्ट्यांचा पाऊस पडला. हौशी कार्यकर्त्यांनी या दोघांच्या हस्तांदोलनाचे क्षणही मोबाईलमध्ये टिपले. वृत्तपत्र छायाचित्रकारांचीही गर्दी उसळली. रविकांत तूपकर यांनी सदाभाऊंना जागा करून दिली. शेट्टी यांनी हसून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ‘सदाभाऊ... सदाभाऊ, धुमधडाका’ अशा घोषणा काहींनी दिल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता.
सदाभाऊ म्हणाले, ‘आज या मोर्चाला येताना मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यांना शेतकरी खवळला असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्याला १०० टक्के कर्जमुक्त करायचे आहे, त्याबद्दल शंका बाळगू नका, असे सांगितले आहे. ते करताना ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत. चळवळीपासून मी जराही बाजूला गेलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जीव ओवाळून टाकण्याची माझी तयारी आहे. मी काय व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तयार झालेला नेता नाही. काळी माती कपाळाला लावून येरवडा जेलमध्ये गेलो म्हणून नेता झालो, हे कुणी विसरु नये. राजाची कपडे घालून सिंहासनावर बसणारा बेगडी राजा मी नव्हे. मी रणांगणात लढणारा शिपाई आहे आणि कधी तलवार काढायची याचेही ज्ञान मला आहे.’
मी सरकारमध्ये शेतकरी व स्वाभिमानी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच सत्तेत असल्याचे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांची चळवळ मला नवीन नाही. गेली तीस वर्षे अनेक प्रश्नांसाठी मी राजू शेट्टी यांच्यासोबत लढलो आहे. त्यासाठी लाठ्या झेलल्या, तुरुंगात गेलो. अनेकांचा रोष पत्करला; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बांधीलकी सोडली नाही. आज सरकारमध्ये असतानाही शेतकऱ्यांचेच प्रश्न सोडविण्याचे काम मी प्रामाणिकपणे करीत आहे. विरोधी पक्षांच्या ध्यानीमनी नव्हते तेव्हा आम्ही तुळजापूरमध्ये जाऊन सातबारा कोरा करण्याच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.’