माझी चूक झाली, जयाजी सूर्यवंशी यांची जाहीर माफी
By admin | Published: June 3, 2017 04:57 PM2017-06-03T16:57:39+5:302017-06-03T17:30:14+5:30
मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - माझी चूक झाली असल्याचं सांगत किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. "मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे," असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत. एबीपी माझाच्या कार्यक्रमात पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जयाजी सूर्यवंशी यांनी हा माहिती देत जाहीर माफी मागितली.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र शेतक-यांमध्ये संभ्रमाचं चित्र निर्माण झालं होतं. जयाजी सुर्यवंशी यांनी सरकारशी हातमिळवणी केल्याची टीका होऊ लागली. शेतक-यांसोबत सोशल मीडियावरही जयाजी सुर्यवंशी यांच्यावर रोष व्यक्त होऊ लागला. सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना गळाला लावल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. शेतक-यांमध्येही गट निर्माण झाले, आणि काहींनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय़ घेतला.
"माझी चूक झाली, पण मी शेतकऱ्यांसोबत कायम आहे. संप स्थगित केला होता, जर संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकऱ्यांसोबत आहे", असं जयाजी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.
"माझा बळीचा बकरा झालाय, मी नेता म्हणून सरकारकडे गेलो नाही. माझी चूक झाली, मी बिनशर्त सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो", असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत.
"जयाजी सूर्यवंशींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी पुणतांब्यातील शेतक-यांनी केल्यानंतर जाहीर माफी मागत पुणतांब्यात जाऊन माफी मागायलाही मला कमीपणा वाटणार नाही, मी त्यांचाच मुलगा आहे", असं ते बोलले आहेत.
कोअर कमिटीत मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत आणखी सदस्य होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच माझ्या मनात काहीच पाप नाही, सदाभाऊंशी चळवळीतील मैत्री आहे असं सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमध्ये पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शेतकरी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय किसान क्रांतीने घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीला मोठ्या संख्यने शेतकरी उपस्थित होते. पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. बैठकीनंतर संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यभरात पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नाशिकमधील बळीराजा संपावर ठाम आहे. नाशिककर बळीराजाचा अद्याप संप सुरू आहे.