माझे माहेर पंढरी
By admin | Published: July 26, 2015 03:08 AM2015-07-26T03:08:48+5:302015-07-26T03:08:48+5:30
पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते.
- प्रा.डॉ. सौ. अलका इंदापवार
(लेखिका संत ज्ञानेश्वर-तुकाराम विश्व प्रतिष्ठानच्या सहसचिव आहेत.)
पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते. येथे प्रत्यक्ष विठ्ठल भक्तांची वाट पाहत उभा आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘तुका म्हणे पेठ भूमिवरी हे वैकुंठ’
पंढरीस दु:ख न मिळे ओखदा।
प्रेमसुख सदा सर्वकाळ।
पुंडलिके हाट भरियेली पेठ।
अवघे वैकुंठ आणियेले।
वैकुंठात दु:ख नसते, सुख नेहमी हात जोडून उभे असते, त्याप्रमाणे पंढरपुरात दु:ख औषधालाही सापडणार नाही. पंढरपूरचे सुख इतके घनदाट आहे की, पंढरपूर हे गाव या सुखाने शिगोशिग भरले.
तुका म्हणे संत लागलिसे घणी।
बैसले राहोनि पंढरीस।।
पांडुरंग माझे पिता आहेत तर राही, रखुमाई, सत्यभामा माझ्या माता आहेत. उद्धव अक्रूर, व्यास, अंबरीष, नारदमुनी यांचाही पंढरीत वास आहे. या अभंगाद्वारे संत तुकारामांनी संतांची मांदियाळीच उभी केलेली आहे. ते पुढे म्हणतात, ‘गरुड बंधू लडिवाळ। पुंडलिक याच कवतिक वाटे मज।’ असे संत-महंत मला नातलगांप्रमाणे आप्त वाटतात. पंढरीत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव तर आहेतच; याशिवाय जीवलग असे नामदेव, नागो, नागमिश्र, नरहरी सोनार, राहिदास, सावतामाळी, परिसा भागवत, संत एकनाथ, चोखामेळा हेदेखील आहेत.
परमार्थ साधनेत ध्येय असते ते अंतिम सुख म्हणजेच मोक्ष मिळविण्याचे. अत्यंतिक दु:खनिवृत्ती व अविनाशी सुखप्राप्ती याला साधारणत: मोक्ष म्हटले जाते. तो मोक्ष पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांना प्राप्त होतो हे सांगत असताना, पंढरपुरात वारकऱ्यांच्या दया, शांती या दैवी गुणांचे संवर्धन होते व त्यानंतरच ते मोक्षाचे अधिकारी होतात, असे संत तुकाराम सांगतात.
मूढ मतिहीन दुष्ट अविचारी।
ते होती पंढरी दयारूप।।
पंढरपूरचे स्थान माहात्म्य असे आहे की, मूर्ख, मतिमंद, दुष्ट यांचे अविचार जाऊन ते परोपकारी होतात. मनातील मरगळ, नैराश्य नाहिसे होते. वैराग्य, शांती, क्षमा असे दैवी गुण भाविक माणसाच्या मनात निर्माण होतात.
पंढरीसी जा रे आलेनि संसारा।
दीनाचा सोयरा पांडुरंगा।
वाट पाहे उभा भेटीची आवडी।
कृपाळू तातडी उतावीळ।
मागील परिहार पुढे नाही सीण।
जालिया दर्शन एकवेळा
तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती।
बैसला तो चित्ती निवडेना।।
मागील जन्मातील प्रारब्ध व पुढील जन्माचा फेरा विठ्ठल दर्शनानं नाहीसा होतो, असा अनुभव संत तुकोबा सांगतात...
तुका म्हणे खरे जाले। एका बोले संताच्या।
पंढरी हे स्वर्गीचे सुख देणारे भूवैकुंठ आहे. तेथे वास करणारा, दीनांचा कैवारी पांडुरंग, त्याला संत तुकाराम वारकऱ्यांच्याकडून निरोप पाठवितात.
पंढरीस जाते निरोप आइका।
वैकुंठनायका क्षेम सांगा।
अनाथांचा नाथ हे तुझे वचन।
धावे नको दीन गांजो देऊ।
भगवंत भेटीची तळमळ, उतावीळता या अभंगातून व्यक्त झालेली आहे. तुकोबा वैकुंठनायकाला आठवण करून देतात की, अनाथांचा तू नाथ आहेस या आपल्या वचनाला विसरून जाऊ नकोस. आम्ही दीन या मायाजंजाळाने गांजून गेलेलो आहोत. तू धावत ये, नि यातून सोडव.
संपदा सोहळा नावडे मनाला।
करीते टकळा पंढरीचा।
जावे पंढरीसी आवडी मनासी।
कधी एकादशी आषाढी
हे तुका म्हणे आर्त ज्याचे मनी।
त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
सर्व सुखाचे निधान एक विठ्ठलच आहे. त्याच्यापुढे दुसरे कोणतेही सुख आनंददायक न वाटणे ही एकविध भक्ती आहे. भक्तिप्रेमातील ही एकतानता, तदाकारता इतकी शिगेला पोहचते की, पंढरीच्या दर्शनावाचून दूर राहणे म्हणजे अग्नीच्या ज्वाळा सहन कराव्या लागण्याचे दु:ख होते. अशी आपली अत्यंत तरल भावावस्था श्री तुकाराम महाराज व्यक्त करतात.
नलगे त्याविण सुखाचा सोहळा।
लांगे मज ज्वाळा अग्निचिया।
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय।
मग दु:ख जाय सर्व माझे।
भगवंताच्या भेटीस असा सर्वस्वाचा त्याग करण्याची संत तुकोबांची विरागीवृत्ती येथे व्यक्त झालेली आहे. संत तुकारामांचे पंढरीप्रेम अनेक अभंगांत व्यक्त झालेले आहे. पंढरीप्रेम, पंढरीची परंपरा, पांडुरंग, पंढरीचा विरह, पंढरीची भौगोलिकता, पंढरी म्हणजे संतसहवास, पंढरी म्हणजे वैकुंठ असे विविध भावतरंग वलयांकित झालेले आहेत. पांडुरंगाप्रमाणे पंढरीही अविनाशी भूवैकुंठ बनले आहे.