माझा मर्डर प्लान परफेक्ट होता

By admin | Published: September 6, 2015 01:30 AM2015-09-06T01:30:18+5:302015-09-06T01:30:18+5:30

शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला

My Murder Plan was perfect | माझा मर्डर प्लान परफेक्ट होता

माझा मर्डर प्लान परफेक्ट होता

Next

मुंबई : शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला होता. शीनाच्या हत्येचा अचूक कट तिने आखला होता. हत्येशी संबंधीत सर्व पुरावेही नष्ट केले होते आणि शीनाचे अस्तित्वही जिवंत ठेवले होते. त्यामुळे शीनाची हत्या पचवल्याचा आत्मविश्वास होता, असे इंद्राणीने पोलिसांना सांगितले आहे.
शीनाच्या हत्येनंतर पुढल्याच महिन्यात मिखाईलच्या हत्येचा कट आखला होता. मिखाईलची हत्याही शीनाप्रमाणेच केली जाणार होती. शीतपेयातून गुंगी आणणारे औषध मिसळून मिखाईलला बेशुद्ध करायचे. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करायची, असे ठरले होते. या गुन्ह्यातही दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय हे दोघे इंद्राणीला सहकार्य करणार होते. मिखाईलची हत्या कोलकात्यात केली जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे.

पीटर यांना क्लीनचीट मिळण्याची शक्यता
इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळण्याची शक्यता आहे. शीनाच्या हत्येनंतर इंद्राणीने हॉटमेलवर शीनाच्या नावे बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून इंद्राणीने पीटर यांनाही ईमेल पाठवले होते. शीनाच्या अचानक गायब होण्याबाबत पीटर यांचा मुलगा राहुलने इंद्राणीवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून पीटर व इंद्राणी यांच्यात वाद सुरू झाले. शीना अमेरिकेत सुखरूप आहे, असे भासवून पीटर यांच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी इंद्राणीने बनावट ईमेलची शक्कल लढवली होती. हेच ई-मेल आता पीटर यांचा मुख्य बचाव ठरत आहेत. शीनाची हत्या झाल्याचे मला माहीत असते तर इंद्राणीने मला बनावट ई-मेल का पाठवले असते, असा सवाल पीटर यांनी खार पोलिसांसमोर उपस्थित केल्याची माहिती मिळते.

तीन महत्त्वाचे ईमेल पोलिसांच्या हाती
इंद्राणीच्या जी-मेल अकाउंवर ८ मार्च २०१२, ४ मे २०१२ आणि ७ आॅगस्ट २०१२ या तीन तारखांना आलेले ईमेल पुरावा म्हणून पंचनामा करत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ड्रायव्हरचा प्रत्यक्ष सहभाग उघड
शीना बोरा हत्याकांडाची उकल झाल्यानंतर इंद्राणीचा चालक श्याम राय याला पोलीस माफीचा साक्षीदार करतील असे संकेत होते. हत्येत सहभाग नव्हता, असा दावा तो करत होता. मात्र चौकशीत शीनाचे हातपाय श्यामने पकडले होते. त्यामुळेच संजीव खन्ना तिचा गळा आवळू शकला, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी श्यामच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना त्याचा वाहनचालकाचा परवाना आणि शीनाचा फोटो सापडला. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर शीना जिवंत आहे असा आभास निर्माण करण्यातही श्यामने इंद्राणीला मदत केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
शीना व राहुल मरोळ परिसरात भाडयाने राहात होते. हत्येनंतर शीनाच्या बनावट सही असलेला भाडेकरार व अन्य कागदपत्रे फ्लॅट मालकाकडे इंद्राणीने पोहोचवले. ही कागदपत्रे श्यामने पोचवली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस श्यामला माफीचा साक्षीदार करतात का, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हत्येआधी क्रेडिट कार्डांवरून खरेदी
शीना बोरा व मिखाईल यांच्या हत्येचा कट आखण्यासाठी तसेच प्रत्यक्ष हत्येसाठी आवश्यक असलेल्या वस्तू इंद्राणीने आपल्या क्रेडिट कार्डांवरून खरेदी केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुळात इंद्राणीकडे एकूण १४ क्रेडीट कार्डे आहेत. त्यापैकी काहींद्वारे ब्रिटेनवरून खरेदी केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

संजीवचा भागीदार, अंगरक्षकाची चौकशी सुरू
इंद्राणीचा दुसरा पती व शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्ना याच्या व्यावसायिक भागीदाराला खार पोलिसांनी पाचारण केले आहे. त्यानुसार हा भागीदार शनिवारी मुंबईत आला असून त्याची खार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शीना हत्येत सहकार्य केल्याबददल इंद्राणीने संजीवला मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली. याच मदतीच्या जोरावर संजीवने कोलकात्यात हॉटेल व्यवसाय सुरू केला, असा संशय पोलिसांना आहे. त्याच दृष्टीने पोलीस संजीवच्या भागिदाराकडे चौकशी करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोलकात्याहून संजीवच्या अंगरक्षकालाही बोलावणे धाडले होते. शनिवारी त्याचीही चौकशी पोलिसांनी केल्याचे समजते.

Web Title: My Murder Plan was perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.