आई-बाबा, ९२ टक्के मिळवूनही माझे कुठे चुकले?
By Admin | Published: June 10, 2015 02:03 AM2015-06-10T02:03:01+5:302015-06-10T02:03:01+5:30
दहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले.
डॉक्टर दाम्पत्याचे अपेक्षांचे ओझे : मुलीने व्यक्त केली मानसोपचार तज्ज्ञाकडे उद्विग्नता
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
दहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले. यानंतरही तुमच्या मनासारखे झाले नसेल तर, आई-बाबा मी काय जीव देऊ? अशा शब्दांत औरंगाबादेतील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीने आपली उद्विग्नता मानसोपचार तज्ज्ञाकडे व्यक्त केली़
अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळविल्याचे दु:ख या डॉक्टर दाम्पत्याला बोचत होते. निकालानंतर आई-वडील आणि मुलगी यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचे मोफत मार्गदर्शन केंद्र गाठले.
९२ टक्के गुण मिळविल्यानंतरही रडून रडून मुलीचे डोळे लाल झाले होते. निकालावर नाराज झालेले वडील म्हणाले की, डॉक्टर, मुलीने समाजात माझी मान खाली घातली. मुलगी ९५ किंवा ९६ टक्के गुण मिळविल, अशी अपेक्षा होती, पण पडले ९२ टक्के. मूर्ख मुलीने पेपर सोडविताना वडिलांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करायला पाहिजे होता. वडिलांचे बोलणे थांबवत आई म्हणाली, हिच्यासाठी काय केले नाही आम्ही? गाडी घेतली. मोबाइल घेऊन दिला. मात्र, मुलीने आमचे नाव घालविले. अहो, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या नर्सच्या मुलाला ९४ टक्के गुण मिळाले. आता तिला कोणत्या तोंडाने सांगू की, माझ्या मुलीने ९२ टक्के गुण मिळविले.
आई-वडिलांचे हे संवाद ऐकल्यानंतर डॉ. शिसोदे यांनी मुलीशी एकांतात चर्चा केली. ती म्हणाली की, डॉक्टर खरे सांगते की, मी ९५ टक्के मिळविण्यासाठी १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. आणखी ३ ते ४ टक्के गुण मिळविण्यासाठी मी काय जीव देऊ? आई-बाबांच्या वागण्याने माझा आत्मविश्वास ढासळला आहे, यापुढे शिकायचेच नाही, असे मला वाटू लागले आहे...
हे झाले एक उदाहरण. आणखी एका मुलाचा कॉल आला. ‘डॉक्टर मला यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर बनायचे आहे. मात्र, दहावीच्या परीक्षेत ९० टक्केच गुण मिळाले. गुण कमी मिळाल्याने घरातील सर्व जण मला ९० टक्क्यांचा कलेक्टर, असे चिडवत आहेत. मी काय करू?’ डॉ. शिसोदे म्हणाले की, आई-वडिलांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, त्यांची क्षमता ओळखून आपण निर्णय घ्यायचा असतो. आई-वडिलांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा. कारण, दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील अंतिम सत्य नव्हे.
हेल्पलाइनवर ८३ जणांनी केले कॉल
विद्यार्थ्यांसाठी डॉ. संदीप शिसोदे यांनी मोफत हेल्पलाइन सुरू केली आहे. अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळाल्याने सोमवारी दिवसभरात ८३ कॉल आले. प्रत्यक्षात १४ पालक व पाल्य त्यांना भेटून गेले. यात कमी गुण मिळाले म्हणून नाराज झालेल्यांचे फोन अधिक होते.