आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:44 PM2023-03-24T12:44:17+5:302023-03-24T12:45:35+5:30
कदाचित हळूहळू आता उदयनराजेंची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे असा टोला आमदार शिवेंद्रराजेंनी लगावला.
मुंबई - साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून भाजपा खासदार आणि आमदारांमध्ये जुंपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भाजपा खासदार उदयनराजे यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर आक्रमक पवित्रा घेत मी पैसा खाल्ला असं कुणी सिद्ध केले तर मिशा काय भूवयाही काढून टाकेन असं म्हटलं. त्यावर आता भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, उदयनराजेंचा मिशा, भूवया काढून टाकेन हा निवडणुकीच्या आधी मारलेला चौथ्यांदा डायलॉग आहे. हा फक्त डायलॉग आहे हे काही करत नाहीत. घराण्याच्या आणि घरंदाजाच्या बाबतीत बोलले कोण? आपण कुठल्या घराण्यातील आहे आपण काय बोलतोय, आपल्या घरातील माणसाबद्दल बोलतोय हे समजण्याएवढी बुद्धी हवी. कदाचित हळूहळू आता बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच निवडणुकीत यांच्यासोबत जाऊन नुसते कमिशनबाजी, पैसे खायचे आणि बगलबच्च्यांना सांभाळायचे हे आपल्याकडून होणार नाही. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माझा मार्ग वेगळा आहे. मी यांच्यासोबत जायचा विषय येत नाही असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये वेगळा पवित्रा घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
काय म्हणाले उदयनराजे?
‘तुम्ही दिवस, वार, वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही भ्रष्टाचार कुठे अन् काय केला तो सांगा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्याचसोबत ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत. तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली असा आरोप उदयनराजेंनी केला.