भाजपात आलो ही माझी अडचण, कारण..; देवेंद्र फडणवीसांसमोरच नारायण राणे असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:58 PM2023-02-06T18:58:11+5:302023-02-06T18:58:56+5:30
शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली असा आरोप नारायण राणेंनी केला.
रत्नागिरी - माझी राजकीय वाटचाल शिवसेनेतून सुरू झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपा. हा शेवटचा पक्ष आहे. आत्ता नंतर कुठला पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो तिथे १०० टक्के असतो. कुणी कितीही ऑफर दिली तरी दगाफटका होणार नाही. ऑफर देणाऱ्याला दगा होईल किंवा फटका होईल पण माझ्याकडून होणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
नारायण राणे म्हणाले की, चांगल्याला चांगले म्हणणं ही माणुसकी आहे. रवींद्र चव्हाण प्रामाणिकपणे काम करतायेत. फक्त १ सांगेन, लोकप्रतिनिधींची गर्दी ही ६ महिन्यांची नाही तर ३३ वर्षाची आहे. मी जे काही दिले त्याच वेळी दिले. मला पण फटाके काढता येतात. मी काढेन तेव्हा पळताभुई थोडी होईल. या जिल्ह्यातही राहता येणार नाही. मी सहन करतोय. कारण भाजपात मी आलोय ही माझी अडचण आहे. भाजपात असल्यानं सहनशीलता बाळगावी लागते. विचारसरणीचे लोक आहेत. आपण त्यातच बसतो मग तसे व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत काहींना रात्री दिसत नाही दिवसा दिसते. पत्रकार त्यांना बाईट देऊन प्रश्न विचारतात. नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. कुठल्या प्रकल्पाठिकाणी आमची जागा आहे. शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली. देश-परदेशात गुंतवणूक केली. कोकणी माणसाने शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली. परंतु कोकणाकडे आणि कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अंगणेवाडीतील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याठिकाणाहून भाजपाचा खासदार, आमदार असेल. कोकणातील चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणेंना द्यावे लागेल. कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. नारायण राणेंनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. याठिकाणी रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, मुलभूत सुविधा हे नारायण राणेंनी आणले असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.