विश्वास देणे माझी जबाबदारी

By admin | Published: July 22, 2016 12:58 AM2016-07-22T00:58:51+5:302016-07-22T00:58:51+5:30

जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

My responsibility to give confidence | विश्वास देणे माझी जबाबदारी

विश्वास देणे माझी जबाबदारी

Next


पुणे : कोपर्डीमधील दुर्दैवी घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना आरोपीला लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला आहे. गावातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला असून, एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
कोपर्डीतील घटना अतिशय दुर्दैवी आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अत्यंत क्रूरपणे हे नराधमी कृत्य करण्यात आलेले आहे. गावामध्ये संताप आहे; मात्र नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला आहे. गावामध्ये पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षकांना दिलेले आहेत. घटना घडल्यानंतर शाळांमधली मुलींची उपस्थिती कमी झाली होती; मात्र आपण भेट दिली तेव्हा शाळांमध्ये मुली मोठ्या संख्येने हजर होत्या. शाळांमध्ये जाऊन शुक्ला यांनी मुलींशी संवाद साधला आहे. छेडछाडीचे प्रकार घडल्यास पालकांना आणि पोलिसांना न घाबरता सांगण्याचे आवाहनही त्यांनी कोपर्डीतील विद्यार्थिनींना केले. त्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक नागरिकांना देऊन त्यावर एसएमएस करण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्याचे शुक्ला म्हणाल्या.
पुण्यामध्येही शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात येत आहे. नुकतीच प्राचार्यांची एक बैठक घेऊन अशा घटना घडत असतील तर त्या घटनांबाबत पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपींना पाठीशी घालून त्यांची हिंमत वाढवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपर्डीतील घटनेचा तपास जिल्हा पोलीस करीत आहेत. त्यावर पोलीस महानिरीक्षकांचे लक्ष आहे. आपण तपासाचा भाग नसल्याचे तसेच केवळ लोकांमधला विश्वास वाढवून तेथील वातावरण पुन्हा पूर्वपदावर आणण्याची आपली जबाबदारी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: My responsibility to give confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.