माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:38 AM2022-02-22T11:38:54+5:302022-02-22T11:39:18+5:30
शहीद रोमित यांना अखेरचा निरोप
शिगाव : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) यांच्या पार्थिवावर शिगाव (ता. वाळवा) येथे शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘शहीद जवान रोमित चव्हाण अमर रहेऽऽ’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव पुण्याहून सकाळी पावणेसातच्या सुमारास शिगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी ‘अमर रहे... अमर रहे... रोमित चव्हाण अमर रहे..’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. पार्थिव प्रथम त्यांच्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाइकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजविलेल्या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. वारणाकाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.
‘एकुलता एक मुलगा देशाच्या कामी आला’
वीरपिता तानाजी चव्हाण म्हणाले, आज रोमित आम्हाला सोडून गेला, याचं दुःख कधीच न भरून येणारं आहे; पण माझा एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी कामी आला, हा अभिमान हे दुःख पचवायची ताकद देत आहे. माझा वाघ जाताना शिगावचं नाव भारतात करून अमर झाला.