नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 01:37 PM2024-05-26T13:37:18+5:302024-05-26T13:37:58+5:30
मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती असा आरोप या निलंबित अधिकाऱ्याने केला आहे.
पुणे - माझ्याविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही हेतूपुरस्परपणे त्रास देण्याच्या आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्याच्या दबावामुळे निलंबन झालं आहे. या निलंबनामुळे माझे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. माझं म्हणणं न ऐकून घेता निलंबन करून माझ्यावर अन्याय झाला असून हे निलंबन मागे घ्यावे यासाठी निलंबित सरकारी अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
डॉ. भगवान पवार यांनी पत्रात म्हटलंय की, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी म्हणून एकूण सेवा ३० वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे १३ वर्षे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. माझे गत ५ वर्षातील गोपनिय अभिलेख अत्युत्कृष्ठ असून वरिष्ठ अधिकारी यांची कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोविड १९ च्या काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. विविध कामकाजाबाबत माझा आयुक्त, आरोग्य सेवा, पुणे जिल्हाधिकारी, पालकंत्री पुणे, सातारा यांच्यामार्फत वेळोवेळी सत्कार केलेला आहे. सद्यस्थितीत मी पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून १३ मार्च २०२३ पासून कार्यरत होतो. याठिकाणी माझ्या कामाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही. पुणे महापालिका आयुक्तांनीही माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरीही शासनाकडून माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत ते मला २४ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता मिळाले असं त्यांनी सांगितले.
तसेच माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून व हेतूपुरस्परपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरित माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करणेस दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे असा आरोप अधिकारी भगवान पवार यांनी केला आहे.
दरम्यान, मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती. पुणे महापालिका आरोग्य अधिकारी हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरूद्धच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने २९ एप्रिल २०२४ रोजी चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करण्यात आले आहे असंही अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी पत्रात लिहून मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निलंबन आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.
रोहित पवारांचा मंत्री तानाजी सावंतांवर आरोप
आमदार रोहित पवार यांनी या पत्राचा संदर्भ देत मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ.… pic.twitter.com/yuTYOgXn55
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2024