२५० कोटींच्या हिशेबाचे गूढ अद्याप कायम
By admin | Published: April 1, 2016 12:34 AM2016-04-01T00:34:31+5:302016-04-01T00:34:31+5:30
आमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची संपत्ती आज जप्त करण्यात आली असली तरी या शिवाय अण्णाभाऊ साठे महामंडळातील महाघोटाळ्यांची किमान २५० कोटी रुपयांची
- यदु जोशी, मुंबई
आमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची संपत्ती आज जप्त करण्यात आली असली तरी या शिवाय अण्णाभाऊ साठे महामंडळातील महाघोटाळ्यांची किमान २५० कोटी रुपयांची रक्कम नेमकी गेली कोणाच्या खिश्यात हे गूढ अद्याप कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ आमदारांच्या मतदारसंघांमध्ये १९० कोटी रुपयांची खैरात वाटण्यात आली होती. प्रत्येकी पाच कोटी रुपये मातंग समाज महिला समृद्धी योजनेंतर्गत वाटण्यात आले. यात बहुतेक प्रकरणे बोगस बनवून पैसा लाटण्यात आला. या पैशांच्या एकाही लाभार्थीवर अद्याप सीआयडीने कारवाई केलेली नाही आणि एक पैसाही जप्त केलेला नाही. सूत्रांनी सांगितले की ही कारवाई झाली तर अनेक जण गजाआड जावू शकतील आणि त्यात बरीच धक्कादायक नावे असतील. महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून ५६ कोटी रुपये आरटीजीएसने काढण्यात आले. ही रक्कम कुठे गहाळ झाली हे अद्याप कळायला मार्ग नाही. वेगवेगळ्या खात्यांमधून या रकमेचा झालेला प्रवास नेमका कोणाच्या खात्यांमध्ये थांबला हे समोर आले तर घोटाळ्याची पाळेमुळे उखडून काढण्यास मदत होणार आहे.
महामंडळात कोणतीही मुलाखत न घेता, अर्जही न घेता ८५ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले. या संपूर्णत: बेकायदेशीर नियुक्त्या होत्या. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीन महिने आधी दाखविण्यात आली आणि त्यांना गृहबांधणी कर्जापोटी प्रत्येकी २० लाख रुपयांचे कर्ज महामंडळाच्या कर्मचारी कल्याण निधीतून देण्यात आले. या पैशांची वसुलीही अद्याप व्हायची आहे. हा पैसा रमेश कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उकळला असा आरोप आहे. महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना देतानाही पैसा खाण्यात आला.
पैशांची खैरात
बारामती आणि मोहोळ येथील दोन दूध संघाना प्रत्येकी साडेपाच कोटी रुपयांची खैरात वाटण्यात आल्याचे प्रकरणही धक्कादायक होते. मातंग वा अन्य कोणत्याही मागास जातीचे संचालक नसलेल्या या संस्थांवर वित्तकृपा करण्यात आली. कदमच अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना १४२ कोटी रुपये वाटण्यात आले.