एन. डी. पाटील खंडपीठाच्या आंदोलनातून बाहेर
By admin | Published: April 9, 2017 04:01 AM2017-04-09T04:01:56+5:302017-04-09T04:01:56+5:30
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि:संदिग्धपणे ग्वाही दिली असतानाही खंडपीठ कृती समितीने त्यांच्यावर अविश्वास
कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि:संदिग्धपणे ग्वाही दिली असतानाही खंडपीठ कृती समितीने त्यांच्यावर अविश्वास दाखवून आंदोलन मागे न घेता स्थगित केले व त्यांना ‘कोल्हापूर बंद’चा अल्टिमेटम दिला. कृती समितीची ही भूमिका मान्य नसल्याने या आंदोलनाचे नेतृत्व सोडत असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
कृती समितीने केलेल्या ठरावाशी आपण एक टक्काही सहमत नाही. ज्यांनी मला स्वत:हून या आंदोलनाचे नेतृत्व दिले, त्यांच्या व माझ्या भूमिकेत फरक पडत असेल तर त्यांचे नेतृत्व करणे तात्त्विकदृष्ट्या मनाला पटत नसल्यानेच हा निर्णय घेत आहे. मला या प्रश्नाात कोणतेही राजकारण करण्याचे नाही, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)