नामशेष होतोय हेमाडपंती मंदिरांचा ठेवा : निधी मंजूर; मुहूर्त मिळेना
By अझहर शेख | Published: July 31, 2017 05:53 PM2017-07-31T17:53:57+5:302017-07-31T22:15:12+5:30
अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक - यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील ...
अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक - यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षाहुन अधिक प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा ठेवा जतन व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीत गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे.
नाशिक शहरापासून अवघ्या २१ किलोमीटर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेल्या अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंतीय पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न केला गेला. येथील सर्व मंदिरांच्या सभोवताली संरक्षक जाळ्यांचे कुंपण भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. सदर मंदिरे ही प्राचीन स्मारके घोषित करून ३ एप्रिल १९१६ साली इंग्रज राजवटीत भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या मंदिरांभोवती पुरातत्व विभागाने संरक्षण कुंपण घालण्याखेरीज दुसरी कुठलीही उपाययोजना हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने केल्याचे दिसत नाही.
गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी कें द्रीय पुरातत्व विभाग निधीअंतर्गत अंजनेरी परिसरातील जीर्ण झालेल्या पुरातन संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी थाटामाटात मंदिरांचे नूतनीकरण व विकासकामाचे उद्घाटन के ले; मात्र हे उद्घाटन सध्या येथे झळकत असलेल्या माहिती फलकाचेच झाले की काय? अशी शंका नाशिककरांसह परराज्यातून येणाºया भाविक व पर्यटकांकडून उपस्थित केली जात आहे. कारण मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र नजरेस पडते. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप मंदिरांच्या विकासकामाला कुठलीही सुरूवात होऊ शकली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड
येथील ऐतिहासिक प्राचीन संरक्षित वास्तू म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केलेल्या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही मंदिरे नामशेष झाली असून सर्वत्र विखुरलेल्या दगडांवरून मंदिरांचे अवशेष लक्षात येतात. काही मंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांचीदेखील पडझड सुरूच आहे. हा दुर्मीळ प्राचीन व उत्कृष्ट स्थापत्यक लेचा नमुना असलेला ठेवा वेळीच जतन करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न लवकर सुरू न झाल्यास हा ठेवा संपूर्णपणे नामशेष होण्याचा धोका आहे.