नायजेरियन नागरिकांची पोलिसांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:30 AM2017-07-31T03:30:28+5:302017-07-31T03:30:28+5:30
अमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन नागरिकांनी नालासोपारा पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ‘इंडियन पुलीस हमारा कुछ नही बिगाड सकती’ अशी दर्पोक्ती करणा-या तिघा नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक
वसई : अमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन नागरिकांनी नालासोपारा पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ‘इंडियन पुलीस हमारा कुछ नही बिगाड सकती’ अशी दर्पोक्ती करणाºया तिघा नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
सदर तक्रार आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे, प्रताप दराडे, मधुकर अवतार, विलास पवार यांचे एक पथक तयार करून या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले होते.
३२ नंबर बिल्डिंगमध्ये नायजेरियन संशयित इसम राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तेथे पोहोचले. तोटेवाड यांनी पासपोर्ट आणि व्हिसासह कागदपत्रांची मागणी केली. त्या वेळी सात ते आठ नायजेरियन त्यांच्यावर धावून गेले. तोटेवाड आणि मधुकर अवतार यांना त्यांनी धक्काबुक्की केली. तुम इंडियन पुलीस हमारा क्या बिगाड सकते हो, अशी दर्पोक्ती करीत नायजेरियन नागरिकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळ काढण्यास सुुरुवात केली.
या वेळी पोलिसांनी ओकेगु किंग्सती (३६), माचू अबुम आगार (३५) आणि टिमोथी ओमुजी (३२) यांना अटक केली. तर पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तपासात सदर परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे उजेडात आले आहे. पळालेल्या नागरिकांची नावे आरोपी सांगत नसल्याने तपास रेंगाळला आहे. नालासोपारा परिसरात शेकडो नायजेरियन नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहिलेले असल्याचे याआधीच उजेडात आले होते. असे असतानाही नालासोपाराहून मुंबईकडे जाणाºया लोकल गाड्यांमधून खुलेआम फिरणाºया नायजेरियन लोकांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. यातील बहुतांशी नागरिक अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचेही लपून राहिलेले नाही. चार महिन्यांपूर्वी येथे नायजेरियन नागरिकाची हत्याही करण्यात आली होती.