लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

By Admin | Published: March 14, 2016 02:37 AM2016-03-14T02:37:24+5:302016-03-14T02:37:24+5:30

केवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले

'Nadajod' from people's participation! | लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

googlenewsNext

गणेश धुरी,  नाशिक
केवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले अन् बघता बघता पाटचारी पूर्ण होऊन कोरड्याठाक नदीत पाणी अवतरले.
बागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरेसह परिसरामधील गावांतील ग्रामस्थांनी एका दिवसात
५०० मीटर पाटचारी खोदली. त्यामुळे १० गावांचा पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी
सुटला.
कपालेश्वर गावाजवळील हत्ती नदीला गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणीच नसल्याने पात्र कोरडे पडले होते. पठावे लघुसिंचन प्रकल्पातून हत्ती नदीला पाणी येते. तो प्रकल्पच कोेरडाठाक असल्याने नदीला पाणीच नव्हते.
कपालेश्वर, किकवारी, विंचुरे व जोरणच्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्याकडे आरम व हत्ती नदी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला.
मात्र आरम नदीतील पाणी थेट हत्ती नदीत आणण्यासाठी अनेक परवानग्या लागणार हे गृहीत
धरून पाटील यांनी पाटचारी खोदण्यासाठी लोकसहभागाची संकल्पना मांडली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट
केले.
दुसऱ्याच दिवशी जेसीबी, इतर यंत्रसामग्रीसह दोनशे ग्रामस्थांनी हाती टिकाव-फावडे घेत पाटचारी खोदकामास सुरुवात केली आणि एका दिवसात काम पूर्ण केले. पाटचारीत सुमारे २४ पाइप टाकण्यात आले.
गावकऱ्यांनी पदरमोड करून हा नद्याजोड प्रकल्प साकारला. अनिल पाटील यांनी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून केळझर धरणातून ५५ दलघफू पाणी हत्ती नदीत सोडण्यासाठी हिरवा कंदील मिळविला. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान हत्ती नदी खळाळून वाहिली. शासकीय निधीची वाट पाहत न बसता वीरगाव गटात लोकसहभागातून जवळपास १२ ते १३ प्रकारची विविध कामे करण्यात आली आहेत. त्यात आरम-हत्ती नद्या जोडण्यासाठी पाटचारी खोदण्यासह नालाबांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण कामे केली. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याबरोबरच भूजलपातळीत वाढ झाली आहे.
- प्रा. अनिल पाटील,
जिल्हा परिषद सदस्य, बागलाण

Web Title: 'Nadajod' from people's participation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.