Nagar Panchayat Election Result: तो एकटा लढला अन् जिंकूनही आला; मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेंनी केलं रोहित पाटलांचं तोंडभरुन कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:51 PM2022-01-19T18:51:11+5:302022-01-19T18:51:51+5:30
कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानं रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे.
मुंबई – राज्यातील नगर पंचायतीचे निकाल समोर आल्यानंतर ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्याचं दिसून आले. नगर पंचायतीच्या निवडणूक निकालात सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगर पंचायतीनं. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या मुलाचं राजकीय कौशल्य पणाला लागलं होतं. एकीकडे सर्वच पक्ष आबांचा मुलगा रोहित पाटील याच्याविरोधात गेले होते. पण या पठ्ठ्याने हार मानली नाही.
कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानं रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पॅनेलनं १०, शेतकरी विकास पॅनेलनं ६ तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर सर्वच स्तरातून रोहित पाटील(Rohit Patil) यांचे कौतुक होत आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट करत रोहित पाटलांचं अभिनंदन केले आहे.
छत्रपती संभाजी मालिकेत राणुक्का भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय की, तो एकटा लढला आणि जिंकूनही आला. २३ वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापिढीसमोर एक आदर्श घालून दिला आहे. जेव्हा रक्तातच जिंकण्याची धमक असते तेव्हा हरवण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करुन देणे आवश्यक असते असं त्या म्हणाल्या आहेत.
तसेच एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व रोहित पाटील यांनी स्व. आर आर आबांचे स्वप्न पूर्ण करत कवठे महांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता खेचून आणल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी ज्यूनिअर आर आर पाटील यांचे कौतुक केले आहे.
आबांची आठवण मनात दाटून येतेय
विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असं रोहित पाटील यांनी विजयानंतर म्हटलं आहे. तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सहकारी यांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, सुमनताईंच्या अनुपस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला. कवठेमहांकाळातील सुजाण नागरिक, कार्यकर्ते मित्र, सहकारी, पत्रकार, राज्यभरातील हितचिंतक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या निवडणूकीत मोलाची मदत केली त्या प्रत्येकांचा हा विजय आहे असंही रोहित पाटील म्हणाले.