‘सैराट’च्या शेवटाची चर्चा नागराजनेही केली नाही - पवार
By admin | Published: July 22, 2016 03:23 AM2016-07-22T03:23:36+5:302016-07-22T03:23:36+5:30
सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही.
मुंबई : सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे हेदेखील ‘सैराट’च्या शेवटाची चर्चा करताना दिसत नाहीत, अशी खंत साहित्यिक व नाटककार संजय पवार यांनी व्यक्त केली.
दादर येथे विजय सातपुते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेतर्फे ‘सैराट : सिनेमाच्या पलीकडे’ या विषयावर बुधवारी सायंकाळी आयोजित परिसंवादात संजय पवार बोलत होते. या वेळी स्त्री चळवळीच्या अभ्यासक प्रतिमा परदेशी, आंबेडकरवादी कार्यकर्ते सुरेश सावंत आणि स्त्रीमुक्तीवादी जेष्ठ कार्यकर्त्या लता प्र. म. उपस्थित होत्या.
प्रतिमा परदेशी यांनी सैराटमधील अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, स्त्रियांना प्रेम व्यक्त करण्यासाठी जागा नाही. मात्र सैराटमुळे मुली प्रेम व्यक्त करू लागल्या आहेत.
तसेच आंबेडकरी चळवळीतील लोकांनी सैराटचा शेवट गांभीर्याने घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. सुरेश सावंत म्हणाले, सैराट हा सिनेमा दलित व बहुजनांचा आहे. मात्र तो ‘फँड्री’एवढा सरस नाही.
आज अनेक चळवळीतले कार्यकर्ते विवाह करताना जात पाहतात, अशी
खंतही त्यांनी व्यक्त केली. तर लता प्र. म. यांनी सैराटची दृष्टी स्त्रीवादी असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
>मनीषा चौधरी यांची मागणी हास्यास्पद
भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी ‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे बलात्काराच्या घटना वाढल्या असून, यातील आक्षेपार्ह भागांवर बंदी घालायला हवी, असे विधान केले होते. मात्र मनीषा चौधरी यांचे हे विधान हास्यास्पद आहे, असेही संजय पवार यांनी चर्चासत्रात नमूद केले.