जुईनगर येथील नाल्यात मगरींचे वास्तव्य

By admin | Published: August 6, 2016 02:39 AM2016-08-06T02:39:18+5:302016-08-06T02:39:18+5:30

सानपाडा व जुईनगर परिसराला जोडणाऱ्या नाल्यात मगरींचे वास्तव्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Nagesh in Junayagar | जुईनगर येथील नाल्यात मगरींचे वास्तव्य

जुईनगर येथील नाल्यात मगरींचे वास्तव्य

Next


नवी मुंबई : सानपाडा व जुईनगर परिसराला जोडणाऱ्या नाल्यात मगरींचे वास्तव्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाल्याकिनारी बसलेली मगर पाहिल्यापासून लगतच्या इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परंतु सदर नाल्याच्या सफाईची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
जुईनगरच्या या नाल्यात मगर असल्याचे २ आॅगस्ट रोजी प्रथमच रहिवाशांच्या निदर्शनास आले. नाल्यालगतच्या झाडीमधून बाहेर येणारी ही मगर पाहणाऱ्यांना धक्काच बसला. त्यापैकी काहींनी या मगरीचे मोबाइलमधून फोटो देखील काढले आहेत. परिसरात इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांना इमारतीवरुन ही बाब प्रथम निदर्शनास आली. त्यांनी रहिवाशांना या प्रकाराची माहिती देताच त्यांनीही नाल्यालगत उघड्यावर बसलेली ही मगर पाहिली. तेव्हापासून नाल्यालगतच्या इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर ज्या ठिकाणी मगर दिसली, त्या ठिकाणापासून काही अंतरावरच जुईनगर स्थानकात जाण्याची पादचाऱ्यांची पाऊलवाट आहे. एकांताच्या वेळी या मगरीकडून त्यांच्यावर हल्ला देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवासी मुकेश भानुशाली यांना सदर मगरीची माहिती मिळताच त्यांनीही सलग दोन दिवस नाल्यामध्ये पाहणी केली असता, त्यांनाही दोन्ही वेळेस पाण्यावर तरंगताना मगर पहायला मिळाली. परंतु अनेकांना दिलेली मगर एकच की त्याठिकाणी इतरही मगरींचे वास्तव्य आहे, याबाबतचा उलगडा होवू शकलेला नाही. भानुशाली हे गेली आठ महिन्यापासून सदर नाल्यातला गाळ काढून नाल्याची सफाई केली जावी यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार करत आहेत. परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अद्यापही नाल्यात डेब्रिजचे ढीग तर अनेक फूट उंच वाढलेली झाडी पहायला मिळत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. अशातच मगरीने त्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. नाल्याला सुरक्षा कठडा देखील नसल्यामुळे सहज ही मगर इमारतींच्या आवारात देखील येवू शकते, अशी भानुशाली यांच्यासह इतर रहिवाशांना भीती सतावत आहे. साधारण ८ ते १० फुटाची ही मगर असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुखापत पोचवून भक्ष बनवू शकते. मात्र ही मगर त्याठिकाणी आली कुठून असाही प्रश्न त्यांना पडला आहे.
औद्योगिक क्षेत्रातले पाणी वाहून नेण्यासाठी असलेला हा नाला जुईनगर स्थानकासमोरून एलोरा इमारतीपासून सानपाड्याच्या मिलेनियम टॉवरपर्यंत जातो. त्यामुळे ही मगर नाल्याच्या संपूर्ण परिसरात वावरत असल्यास जुईनगर ते सानपाडापर्यंत नाल्यालगत वावरणाऱ्यांना तिच्यापासून हानी पोचण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nagesh in Junayagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.