नाशिकच्या नागेश कांबळेंची ‘रेफरन्स सर्व्हिस’
By admin | Published: September 25, 2016 07:17 AM2016-09-25T07:17:07+5:302016-09-25T07:26:39+5:30
मराठीतील एखाद्या साहित्यिकाविषयी, त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी कोणाला काही संदर्भ हवा असेल तर त्याने नाशिकच्या नागेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा आणि कांबळे
धनंजय वाखारे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि.25- मराठीतील एखाद्या साहित्यिकाविषयी, त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी कोणाला काही संदर्भ हवा असेल तर त्याने नाशिकच्या नागेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा आणि कांबळे यांनीही दिवस-रात्र कालमान न पाहता तितक्याच उत्साहाने संशोधकांची संदर्भविषयक भूक भागवावी, असा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. अनेक दिग्गज लेखकांच्या ग्रंथसूची निर्माण करणाऱ्या या अवलियाची संपूर्ण महाराष्ट्रात ‘ग्रंथसूचीकार’ म्हणून ओळख बनली आहे. आजमितीला कांबळे यांच्याकडे मराठी साहित्याचा सुमारे २०० वर्षांचा समृद्ध इतिहास उपलब्ध आहे.
घरामध्ये आपल्याला साधी किराणा मालाची यादी करायची तर आधी घरात काय आहे अन् काय नाही, याची शोधाशोध करावी लागते. परंतु नाशिकस्थित नागेश कांबळे यांनी तर नावाजलेल्या साहित्यिक-लेखकांच्या ग्रंथसंपदांची सूची अतिशय मेहनतीने तयार करत संशोधक आणि वाचकांचा मार्ग प्रशस्त केला आहे. सूची बनविण्याचे किचकट आणि गुंतागुंतीचे काम करताना कांबळे यांनी केवळ ग्रंथांची नामावली दिलेली नाही, तर त्या-त्या लेखकाची झालेली जडणघडण, मिळालेले पुरस्कार, अप्रकाशित वा दुर्मीळ साहित्य अशा विविध बाबींचा अंतर्भाव करत ग्रंथसूचीचे संदर्भमूल्य अधिक परिपूर्ण केले आहे. नाशिकच्या राजीवनगर भागातील कांबळे यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ बंगल्यात तुम्ही कधी गेलात, तर कांबळे तुम्हाला सतत लिखाणकामात व्यग्र असलेले बघायला मिळतील. त्यांची खोली विविध वृत्तपत्रांची कात्रणे, नियतकालिके, पुस्तके, झेरॉक्स प्रतींचे गठ्ठे यांनी व्यापलेली दिसेल. मूळचे तुळजापूरचे असलेले कांबळे यांच्या कुटुंबीयांचा भिक्षुकी व्यवसाय. त्यांचे कुटुंब हे तुळजाभवानी मंदिराचे पुजारी. शासकीय सेवेत ग्रंथपाल म्हणून दाखल झालेले नागेश कांबळे यांचे सेवाकाळात नाशिकला वास्तव्य होते तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. एकदा तात्यासाहेबांशी गप्पा मारत असताना आपण कोठे, काय लिखाण केले याची नोंद खुद्द तात्यासाहेबांकडेही नव्हती. त्यातूनच कांबळे यांनी तात्यासाहेबांच्या विविधांगी साहित्याची सूची करण्याची इच्छा बोलून दाखविली. तात्यांचा होकार मिळाल्यानंतर कांबळे यांनी मेहनतीने संदर्भ गोळा करत सुसज्ज अशी सूची तयार केली. आपल्या साहित्यप्रपंचाची कुंडलीच हाती पडल्याचे पाहून तात्यासाहेब हरखून गेले आणि त्यांनी कांबळेंना पेन भेट दिले. तेथूनच कांबळे यांच्यातील सूचीकाराचा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत कांबळे यांनी व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, मंगेश पाडगावकर आदि दिग्गज लेखकांच्या ग्रंथसूचींचे काम पूर्णत्वाला नेलेले आहे. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
सेवानिवृत्तीनंतर नाशिकला स्थायिक झालेले कांबळे यांच्याकडे दोनशे वर्षांचा मराठी साहित्याचा पट उपलब्ध आहे. तुम्ही कोणताही संदर्भ विचारा, कांबळे यांच्याकडून लगेच मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्यातील प्रतिभेची चुणूकही दाखवतो. वयाच्या सत्तरीतही हा माणूस झपाटल्यागत काम करतो आहे आणि संशोधकांची संदर्भभूक न थकता उत्साहाने भागवितो आहे.
समग्र सावरकर वाङ्मयकोशचे निर्माणकार्य
नागेश कांबळे यांना सध्या ‘सावरकर’ या नावाने झपाटले आहे. कांबळे यांच्याकडून समग्र सावरकर वाङ्मयकोशचे निर्माणकार्य सुरू आहे. पाच खंडात साकार होणारा हा ग्रंथ सुमारे दहा हजार पानांचा असेल, अशी माहिती नागेश कांबळे देतात. त्यात प्रामुख्याने, सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ, सावरकरांवर इतरांनी लिहिलेले ग्रंथ, विविध मासिकांचे विशेषांक, सावरकरांवर विविध संस्थांनी काढलेल्या स्मरणिका, सावरकरांवर विविध नियतकालिके व वृत्तपत्रांत आलेले लेख आदिंचा समावेश आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांशी संबंधित सर्व संदर्भ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ‘ज्ञान वाटल्याने वाढते’ यावर विश्वास असलेल्या कांबळे यांच्याकडून कोणताही मोबदला न घेता दिली जाणारी ही संदर्भ सेवा आजवर असंख्य संशोधक, वाचक व लेखकांना उपयुक्त ठरली आहे.