नागपूरमध्ये सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण,महिला कर्मचा-यांनाही शिवीगाळ
By admin | Published: September 13, 2016 09:08 PM2016-09-13T21:08:50+5:302016-09-13T21:08:50+5:30
नागपूरमध्ये एका सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यात भावाला विनाकारण गोवल्याचा आरोप करीत दोघांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाची
Next
>
नरेश डोंगरे, ऑनलाइन लोकमत
नागपूर : राज्यात पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. नागपूरमध्ये एका सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यात भावाला विनाकारण गोवल्याचा आरोप करीत दोघांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाची (एपीआय) कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. झटापटीत एपीआय अरविंद रामाजी पवार (वय ३६) यांच्या वर्दीचे बटन तुटले. सोमवारी रात्री ८.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे कळमना पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
कळमना पोलिसांनी सोमवारी एका व्यापा-याच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. यात आरोपी बनविलेल्या तरुणाचे नातेवाईक रमण शाम असुफा आणि रजत शाम असुफा (रा. वक्रतुंड अपार्टमेंट, कळमना) सोमवारी रात्री कळमना ठाण्यात पोहचले. यावेळी येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्यासोबत असुफा बंधूंनी वाद घातला. मोठमोठ्याने बोलत असल्यामुळे एपीआय पवार यांनी त्यांना गप्प बसा किंवा बाहेर जा, असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या असुफा बंधूंनी पवार यांच्या शर्टाची (वर्दीची) कॉलर पकडली. पवार यांना मारहाण करून त्यांच्या शर्टाचे बटन तोडले. या घटनेमुळे ठाण्यात गोंधळ वाढला.
---
महिला कर्मचा-यांनाही शिवीगाळ
एपीआय पवार यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, असुफा बंधूंनी ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचा-यांनाही शिवीगाळ केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी असुफा बंधूंना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तसेच धमकावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात केली आहे.