नागपूर ऑडी अपघात: संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली पण निर्माण झाले अनेक प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:20 PM2024-09-10T14:20:45+5:302024-09-10T14:27:34+5:30
Nagpur Audi hit and run: नागपुरातील अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आहे. तो त्या कारमध्ये होता हे कन्फर्म नव्हते असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अपघाताने पुन्हा एकदा पुण्यातील बिल्डर बाळाच्या अपघाताची आठवण करून दिली आहे.
मुंबई आणि पुण्यातील हिट अँड रनच्या अपघातांनी राजकारणी, पोलीस यंत्रणांना सळो की पळो करून सोडलेले असताना रविवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडी कारने दोन कार व एका दुचाकीला धडक देत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कारमधील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत होते हे पोलिसांनी कबुल केले आहे. परंतू, या कारमध्ये बावनकुळेंचा मुलला संकेतही होता, हे पोलिसांना मद्यधुंद तरुणांच्या चौकशीतून समजले आहे. आता दोन दिवसांनी संकेत बावनकुळेची टेस्ट घेतली जाणार का, घेतली तर ती पॉझिटीव्ह येईल का असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार मार्गावर ऑडी कारने हा हिट अँड रनचा अपघात केला आहे. पोलिसांनी एबीपीला दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये तीनजण होते. यात बावनकुळेंचा मुलगाही होता. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार हे दोघे मद्य प्राशन करून होते. या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अर्जुन वाहन चालवत होता. या दोघांच्या चौकशीत अपघात झाला तेव्हा संकेतही होता व ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर बसला होता, असे समोर आले आहे. अर्जुनवरच गुन्हा दाखल असून संकेत आणि रोनितवर गुन्हा दाखल नाही. तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. लायसन आहे नाही, गाडी चालकाकडे कशी गेली याची चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले.
अर्जुन आणि रोनितच्या चौकशीत संकेतही त्यांच्यासोबत होता, असे आम्हाला समजल्यामुळे सोमवारी रात्री संकेत वाबनकुळेला चौकशीला बोलविले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. हे तिघे लाहोरी हॉटेलच्या बारमधून येत होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, सीसीटीव्ही डिलीट केले हे सत्य नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात काय घडलेले?
विशाल अग्रवाल बिल्डर बाळाने पुण्यात जेव्हा अपघात केलेला तेव्हा त्याला वाचविण्यासाठी पोलीस यंत्रणा, आमदार कामाला लागले होते. त्याला बर्गरही खायला देण्यात आले होते. तसेच त्याची वैद्यकीय चाचणी दुसऱ्या दिवशी करण्यात आली होती. तिथेही त्याचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणात विरोधकांनी आवाज उठविल्याने हे सर्व कारनामे बाहेर आले होते.
तर संकेत बावनकुळे कार का चालवत नव्हता...
नागपुरातील अपघातात बावनकुळे यांचा मुलगा आहे. तो त्या कारमध्ये होता हे कन्फर्म नव्हते असे पोलिसांचे म्हणणे आहे. ती कार मद्यधुंद अवस्थेत अर्जुन चालवत होता, तर रोनित मागे बसला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी केली होती. परंतू, कारचा मालक असलेला बड्या राजकारण्याचा मुलगा असल्याने त्याची चौकशी, चाचणी केली नव्हती, असा विरोधक आरोप करत आहेत. आता उशीरा वैद्यकीय चाचणी करून काय निष्पन्न होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच संकेत बावनकुळेने जर दारु प्राशन केलेली नव्हती तर तो त्याची कार का चालवत नव्हता? दारुच्या अंमलाखाली असलेल्या मित्राला कार का चालवायला दिली होती? अपघात झाल्यानंतर घटनास्थळाहून पळून का गेले, शुद्धीत होता तर थांबला का नाही, बावनकुळेंच्या कारला नंबरप्लेट का नव्हती, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.