नागपूरमध्ये आयकर अधिकाऱ्यांची बोगस टोळी पकडली
By admin | Published: August 23, 2016 11:29 PM2016-08-23T23:29:07+5:302016-08-23T23:29:07+5:30
आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
तिघांना अटक : वाशिम पोलिसांची नागपुरात कारवाई
नागपूर : आयकर अधिकारी असल्याचे सांगून उद्योजक व भ्रष्ट अधिकाऱ्यांसह अनेकांना लुटणाऱ्या बोगस आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीच्या तीन सदस्यांना नागपुरातुन ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही टोळी नागपुरातील आहे. त्यांचे सहा ते सात सहकारी फरार आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुरेंद्र कोहळे (२९) पोलीस लाईन टाकळी, प्रकाश अशोक आष्टीकर (४५) रामनगर, अंबाझरी, संदीप रत्नाकर देशमुख (४९) अंबाझरी यांचा समावेश आहे. संदीप शिक्षक असून, तो खासगी शिकवणी घेतो.
टोळीत आठ ते दहा सदस्य आहेत. टोळीचे सदस्य चारचाकी वाहनांमध्ये व्यापारी, राजकीय नेता व अवैध धंद्यांमध्ये समाविष्ट असलेल्यांचा शोध घेतात. टार्गेट केलेल्या व्यक्तीकडे अधिकाऱ्यांसारखा पेहराव करून जातात. आयकर अथवा सीबीआयच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगून घराची झडती घेतात. संधी मिळताच रुपये, दागिने आणि किमती सामान घेऊन पळ काढतात. या टोळीने ९ आॅगस्टला सकाळी ८.३० वाजता वाशिम जिल्ह्यातील सोपान कंवर यांच्या घरी धाड टाकली. स्वत:ला आयकर विभागाच्या स्पेशल टीमचे सदस्य असल्याचे सांगितले. सोपान कंवर हे बिल्डर आहे. त्यांनी या टोळीकडून आयकर विभागाच्या संबंधित कागदपत्राची मागणी करीत, घराची झडती देण्यास नक ार दिला. परंतु आरोपी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घराची झडती घेऊ लागले. कंवर यांनी आरोपींकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे कुठलेही दस्तावेज नसल्याने, कंवर यांनी आयकर विभागाचे अधिकारी व त्यांच्या सीएला फोन केला. आरोपींच्या हे लक्षात येताच त्यांनी ‘दुसऱ्या जागी छापा मारायचा आहे’ असे सांगून तेथून पसार झाले.
ते गेल्यानंतर कंवर यांनी आयकर अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन प्रकरणाची माहिती दिली. आयकर विभागाने कुठल्याही टीमला पाठविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कंवर यांनी वाशिम पोलिसात तक्रार केली. पोलिसांच्या तपासात आरोपीजवळ असलेल्या कारचा नंबर मिळाला. कारच्या नंबरच्या आधारावर वाशिम पोलीस २० आॅगस्टला नागपुरात पोहचले. आरोपींना ताब्यात घेऊन सोबत घेऊन गेले. ही कारवाई वाशिमचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली.