नागपुरात ग्राहकांची दिवाळी, ३ हजार दुचाकी तर १०० कारची हातोहात विक्री
By Admin | Published: April 1, 2017 02:42 PM2017-04-01T14:42:34+5:302017-04-01T14:46:44+5:30
वाहन विक्रेत्यांनी वाहनांवर मोठी सूट दिल्याने एकट्या उपराजधानीत तीन हजार दुचाकी तर १०० चारचाकींची हातोहात विक्री झाली
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 1 - सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदीला व विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने व वाहन विक्रेत्यांनी वाहनांवर मोठी सूट दिल्याने एकट्या उपराजधानीत तीन हजार दुचाकी तर १०० चारचाकींची हातोहात विक्री झाली. यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) २ कोटी १७ लाखांचा महसूल प्राप्त झाला. विशेष म्हणजे, बहुसंख्य वाहन विक्रेत्यांकडे असलेल्या वाहनांचा ‘स्टॉक’ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच संपला. परिणामी, अनेक ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र, ज्यांना दुचाकीवर ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर ७० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळाली त्यांनी ‘दिवाळी’सारखा आनंद साजरा केला.
‘बीएस-३’ या वायूप्रदूषणविषयक मानकाची दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे. शिवाय १ एप्रिल २०१७ पासून अशा वाहनांची नोंदणीही होणार नाही. त्याऐवजी ‘बीएस-४’ या वायूप्रदूषण मानकाची पूर्तता केलेल्या वाहनांचे उत्पादन व विक्री होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने स्थानिक वाहन (ऑटोमोबाईल) क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘बीएस-३’ वाहनांना ग्राहक मिळण्यासाठी शहरातील बहुसंख्य वाहन विक्रेत्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘बंपर डिस्काऊंट’ उपलब्ध करून दिले होते. यामुळे गुरुवारपासून बहुसंख्य वाहन विक्रेत्यांचे शोरुम ग्राहकांनी फुल्ल होते. मात्र शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेकांकडील वाहनांचा ‘स्टॉक’ संपला. दोन दिवसात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये तीन हजार दुचाकी तर १०० कार्सची विक्रमी विक्री झाली.
-‘आऊट ऑफ स्टॉक’ चे लागले फलक
‘बीएस-३’ वाहनांच्या विक्रीची ३१ मार्च ही शेवटची तारीख असल्याने दुचाकी वाहनांवर साधारण ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर साधारण ७० हजार रुपयांपर्यंत सूट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येत ग्राहक मोठ्या आशेने विविध शोरुममध्ये पोहचले. परंतु दुपारी १२ वाजत नाही तोच ‘आऊट आॅफ स्टॉक’चे फलक लागणे सुरू झाले. यामुळे ग्राहकांमध्ये निराशा पसरली. काहींनी अधिकाºयांपासून ते नेत्यापर्यंतची मदत घेऊन ‘डिस्काऊंट’मध्ये वाहन मिळते का याचेही प्रयत्न केल्याचे समजते.
-रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते शोरूम
बहुसंख्य शोरुममधील दुचाकी वाहनांचा स्टॉक शुक्रवारी संपला होता. परंतु चारचाकी वाहनांच्या विक्रीसाठी रात्री १२ वाजेपर्यंत शोरुम सुरू ठेवण्यात आले होते. तर विक्री झालेल्या दुचाकी वाहनांचे कागदोपत्र तयार करण्यासाठी वाहन विक्रेत्यांचे कर्मचारी राबताना दिसून येत होते.
-पूर्व नागपुरात पडल्या ग्राहकांच्या उड्या
पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत दोन दिवसांत साधारण १२१० दुचाकी तर ४० कार्स असे एकूण १२५० वाहनांची विक्री झाली. त्या तुलनेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरांतर्गत दुचाकी व चारचाकी वाहन मिळून ६९४ वाहनांची विक्री झाली. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत ११५६ वाहनांची विक्री झाली.
-आरटीओचे उद्दिष्टही झाले पूर्ण
नागपूर शहर आरटीओ कार्यालयाला महसुलाचे एकूण उद्दिष्ट (टार्गेट) १३२.६७ कोटी तर पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाला ५५.२७ कोटी देण्यात आले होते. या दोन दिवसांच्या विक्रमी वाहनांच्या विक्रीमुळे या दोन्ही कार्यालयाला मोठा महसूल मिळाला. परिणामी, १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत पूर्व नागपूर आरटीओला ९९ कोटींचा महसूल प्राप्त झाला. यामुळे दिलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत १७६ टक्के लक्ष्य प्राप्त करण्यात या कार्यालयाला यश मिळाले. मात्र शहर आरटीओला ८४ कोटीचे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य झाले.