नागपुरात पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी
By admin | Published: February 11, 2016 01:41 AM2016-02-11T01:41:13+5:302016-02-11T01:41:13+5:30
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या
नागपूर : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मदतीने झालेले हे प्रत्यारोपण आर्थिक अडचणीत असलेल्या किडनीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. नागपुरात २००वर रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१४च्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न समोर आला. तेव्हा अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली. शहजादी परवीन यांची २४वर्षीय मुलगी आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. ती डायलिसीसवर होती. तिला जीवनदान देण्यासाठी तिच्या आईने किडनी देण्याचे ठरविले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाली. मूत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रा. डॉ. धनंजय सेलुकर, प्रा. डॉ. समीर चौबे, नेफ्रालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. विजय श्रोत्री, सहायक प्रा. डॉ. मनीष बलवाणी व प्रत्यारोपण समन्वयक मोहिताज शेख आदींच्या सहकार्याने साडेतीन तासांत शस्त्रक्रिया झाली. (प्रतिनिधी)
ब्रेन डेड (मेंदू मृत) घोषित केलेल्या व्यक्तीची (कॅडेव्हर) किडनी काढून गरजू रुग्णांमध्ये ट्रान्सप्लांट करण्यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे. या रुग्णालयाचा गरीब रुग्णांना जास्तीतजास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल