‘समृद्धी’ प्रमाणे होणार ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस-वे’ , उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:28 PM2022-09-25T12:28:05+5:302022-09-25T12:28:29+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे.
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित होऊन विदर्भ व मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे केली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (नरेडको) विदर्भ चॅप्टरच्यावतीने आयोजित ‘प्राइड ऑफ लँड अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना विविध गटांतील उपलब्धीसाठी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, नागपूर शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा येथे पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठे शहर आठ ते दहा तासांत नागपूरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे नागपुरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किमीचे ‘एक्स्प्रेस’ महामार्ग तयार करण्याचे सूतोवाच केले आहे. हैदराबाद, दिल्लीकरिता नवीन मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात लॉजिस्टिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील सर्वांत मोठा इकॉनॉमिकल कॉरिडॉर म्हणून विकसित होणार आहे. त्याच धर्तीवर आता नागपूर ते गोवा महामार्गाचा विचार केला जात आहे.
फायलींवर बसणारे सरकार नाही
राज्यातील नवीन सरकार फायलींवर बसणारे नव्हे, तर वेगाने निर्णय घेणारे आहे. सरकारकडे केवळ दोन वर्षे आहेत. अशा स्थितीत २०-२० सामना खेळायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांची खैर नाही
पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, राज्य असो वा देश, कुठेही पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांना सोडणार नाही. कुठेही लपून बसले तरीही त्यांना शोधून योग्य शिक्षा करूच.