नागपुरात ३० वर्षापासून सुरु आहे ‘शिव वैभव किल्ले स्पर्धा’
By Admin | Published: October 8, 2016 09:33 AM2016-10-08T09:33:06+5:302016-10-08T09:37:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे अनेक अर्थाने एक आदर्श राज्य होते. महाराजांनी बांधलेले व शत्रुंकडून हस्तगत केलेले किल्ले हे त्यांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षी देणारे आहेत.
style="text-align: justify;">
निशांत वानखेडे, ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ - छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे अनेक अर्थाने एक आदर्श राज्य होते. महाराजांनी बांधलेले व शत्रुंकडून हस्तगत केलेले किल्ले हे त्यांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षी देणारे आहेत. हे एकेक दुर्ग महाराष्ट्राच्या जडणघडणीतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहेत. मात्र आजची पीढी हा सांस्कृतिक वारसा विसरत चालली आहे.
टीव्ही, संगणक व आता मोबाईलमध्ये रमणा-या पीढीला हा ऐतिहासिक वारसा कितपत ठाउक असेल ही शोकांतिका आहे. मात्र त्याची खंत ठेवून गप्प बसण्यापेक्षा महाराजांचे वैभव नव्या पीढीर्पयत तळमळीने पोहचविण्याचा प्रयत्न नागपूरचे शिवप्रेमी रमेश सातपुते करीत आहेत. या किल्ले वैभवाशी अतिशय भावनिकतेचे नाते जपणा-या या मनस्वी माणसाने गेल्या ३० वर्षापासून हा अखंड प्रयत्न चालविला आहे.
अनेक छंद जोपासणारे आणि सामाजिक कार्यात सहभागी रमेश सातपुते यांनी शिवकिल्ले वैभवाची एक परंपराच नागपुरात सुरु केली आहे. एके काळी दिवाळीच्या सुटय़ांमध्ये घरी गड-दुर्ग प्रतिकृती साकारण्याची हौस मुलांमध्ये असायची. यातून त्यांच्यातील कलात्मक सुप्त गुणांचा अविष्कार घडायचा. मात्र कालांतराने ही कलात्मकता बंद झाली. अशावेळी 1986 साली ‘शिव वैभव किल्ले स्पर्धा’ या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा सातपुते यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी अवघ्या 6 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. आज शहरभरातील १०० च्या जवळपास स्पर्धक यामध्ये सहभागी होतात. मुलांमध्ये गडकिल्ल्यांचे आकर्षण निर्माण व्हावे, त्यांना यामार्फत इतिहासाचे ज्ञान मिळावे हा हेतू यामागे होता.
पुढे रमेश सातपुते यांनी स्पर्धेचे स्वरुपच बदलविले. त्यांनी स्पर्धेतून वयाचे, जागेचे बंधनच काढून टाकले. बालकांपासून प्रौढांर्पयत कुणीही किल्ले निर्मितीत सहभागी होउ शकतात. घरी, शाळेत किंवा मिळेल त्या ठिकाणी किल्ले निर्माण करण्याची मुभा देण्यात आली. यामुळे मुलेच नाही तर अख्खे कुटंबिय आनंदाने व श्रमाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे रमेश सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. किल्ले निर्मितीसाठी साहित्य वापराचीही अट नाही. त्यामुळे माती, विटा, थर्माकोल, सिमेंट, शेण अशा विविध सामग्रीचा वापर करून किल्ले निर्माण केले जातात.
किल्ले स्पर्धा तीन गटात होते. यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले, विदर्भातील किल्ले व काल्पनिक किल्ल्यांचा समावेश होतो. किल्ले तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरावी इथपासून किल्ल्यांच्या स्वरुपाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सातपुते करीत असतात.
शिवकालिन किल्ल्यांचे स्परुप कळावे यासाठी गड-दुर्गाची माहिती देणारी पुस्तके, नकाशे, व्हीडीओ सीडी अशी सर्व सामग्री ते स्पर्धकांना उपलब्ध करतात. यादरम्यान किल्ले निर्मितीची कार्यशाळा ते घेत असतात. त्यानंतर भाउबिजेच्या दुस:या दिवशीपासून हे किल्ले परीक्षणाचे काम सुरु होते. संपूर्ण शहरात कुठेही बांधण्यात आलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षकांकडून निरीक्षण केले जाते.
त्यासाठी दोन दोन दिवस रात्री बेरात्री फिरावे लागत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. मात्र अशावेळीही स्पर्धक उत्सुकतेने परीक्षकांची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काही शाळाही या स्पर्धेमध्ये जुडल्या आहेत, हे विशेष. शत्रुलाही आकलन न होणारे वैशिष्ठपूर्ण बांधकाम शिवकालिन किल्ल्यांमध्ये होते. या माध्यमातून महाराजांचे जीवनचरित्र जानून घेण्याची आवड मुलांमध्ये निर्माण होते. लोकांच्या 15 दिवस किंवा महिनाभराच्या परिश्रमानंतर निर्माण होणा:या किल्ल्यांच्या प्रतिकृती किल्लेवैभवाचे अलौकीक दर्शन घडविणा:या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अनेक अडचणी आहेत
या उपक्रमामुळे मुलांमध्ये किल्ले आणि आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी आवड निर्माण होत आहे. मात्र यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या स्पर्धेला दिड लाखार्पयत खर्च येत असून मोठी अडचण अर्थ सहकार्याची आहे. अशा उपक्रमासाठी महानगरपालिका किंवा मोठय़ा संस्थांनी आर्थिक सहकार्य केल्यास आणखी पाठबळ मिळू शकेल. आता स्पर्धकांची संख्या वाढली आहे. शिवाय प्रोत्साहन म्हणून त्यांना बक्षिसही द्यावे लागते. त्यामुळे प्रायोजक मिळाले तर लोकांचा प्रतिसाद वाढू शकेल. दुसरीकडे किल्ल्यांच्या निरीक्षणासाठी परीक्षक मिळविण्याला त्रस सहन करावा लागतो. त्यामुळे इतिहासाची माहिती असणा-या व्यक्तींनी समोर येण्याची गरज आहे.
रमेश सातपुते, संयोजक, शिव वैभव किल्ले स्पर्धा