मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही गृहप्रकल्प

By admin | Published: November 1, 2016 05:25 AM2016-11-01T05:25:18+5:302016-11-01T05:25:18+5:30

सेवानिवृत्तीनंतर हक्काचा निवारा मिळावा म्हणून राज्य सरकार निवृत्त पोलिसांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अल्प किमतीत घर देणार आहे.

Nagpur is home based on the lines of Mumbai | मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही गृहप्रकल्प

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही गृहप्रकल्प

Next


नागपूर : सेवानिवृत्तीनंतर हक्काचा निवारा मिळावा म्हणून राज्य सरकार निवृत्त पोलिसांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अल्प किमतीत घर देणार आहे. मुंबईत पोलिसांसाठी १० हजार घरांची योजना आहे. त्याच धर्तीवर नागपुरातही गृहप्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
बजाजनगर नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन आणि त्यानंतर गिट्टीखदान परिसरात २८० घरकूल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, माजी महापौर मायाताई इवनाते आदींची उपस्थिती होती. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांत सर्वसुविधायुक्त ३० हजार निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. नागपूर, नाशिकसह वेगवेगळ्या भागात पोलीस गृहनिर्माणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

>गुन्हेगारीचा संयुक्त सामना
गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी नागपूर शहर व ग्रामीण पोलीस हातात हात घालून काम करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, शहरातील बजाजनगर, शांतिनगर, कळमना, मौदा, हिंगणा, कान्होलीबारा, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी १३ कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. मिहानसह औद्योगिक क्षेत्र तसेच इतर संस्थांसाठी सुमारे २० हजार सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूर येथे महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कार्यालय सुरू करावे, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रास्ताविक केले. पोलीस ठाणे निर्मिती, गृहप्रकल्प बांधकाम, तसेच नवीन पोलीस ठाण्यांच्या आवश्यकतेचा आढावा त्यांनी घेतला. आभार प्रदर्शन सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी केले.
>डिटेक्शन रेट वाढला,
नावलौकिक वाढवा!
गुन्ह्यांचा शोध लावण्यासोबतच गुन्हेगारांना शिक्षा होईल, त्यासाठी राज्य पोलीस यंत्रणेकडून उल्लेखनीय प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचमुळे डिटेक्शन रेट (गुन्ह्यांचा शोध) ९ टक्क्यावरून ५२ टक्क्यांवर पोहचला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कुटुंबांसाठी विशेषत: महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी कौशल्य विकास योजना सुरू करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
दहा हजार मुलांचा शोध
आॅपरेशन मुस्कान अंतर्गत गहाळ झालेल्या दहा हजार मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबात पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पोलीस विभागाने केले आहे. आपल्या कुटुंबातील बेपत्ता व्यक्ती मिळाल्याने त्यांच्याकडे दिवाळीसारखा आनंदोत्सव आहे.
अपघातमुक्त नागपूर संकल्पना : नितीन गडकरी
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठी शहरातील रस्ते व पायाभूत सुविधा चांगली करण्यात येत आहे. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे अपघातप्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी ११ हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध आहे. त्यासाठी नागपूर शहर व जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करा, असे ते म्हणाले. वाहतूक नियंत्रणासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर होत असल्याचे सांगताना ते म्हणाले की, डिजिटल लॉकर या योजनेचा १८ कोटी नागरिकांना लाभ होणार आहे. नागपूरच्या उष्णतेमध्ये वापरता येईल असे लाईट हेल्मेट तयार करण्यासाठी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Nagpur is home based on the lines of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.