नागपूर आयटी हब होणार
By admin | Published: January 16, 2015 12:59 AM2015-01-16T00:59:14+5:302015-01-16T00:59:14+5:30
आयटी क्षेत्र हायटेक झाले आहे. दरदिवशी नवनवीन संशोधन होत असते. विकासाच्या अपार संधी असलेल्या नागपुरात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. भविष्यात नागपूर आयटी हब होईल,
मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन : ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे आयोजन
नागपूर : आयटी क्षेत्र हायटेक झाले आहे. दरदिवशी नवनवीन संशोधन होत असते. विकासाच्या अपार संधी असलेल्या नागपुरात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. भविष्यात नागपूर आयटी हब होईल, असा विश्वास मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी येथे व्यक्त केला.
विदर्भ कॉम्प्युटर अॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कॉम्पेक्स एक्सपो-२०१५ व डेस्टिनेशन आयटीचे पाच दिवसीय आयोजन कस्तूरचंद पार्कवर सुरू आहे. उद्घाटनाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून हर्डीकर बोलत होते. यंदा एक्सपोचे २३ वे वर्ष आहे.
अशा आयोजनाने आयटी तज्ज्ञांना ज्ञान प्रगत करण्यास मदत होते. ३डी प्रिंटरचे उदाहरण देताना लोकांना हवे ते उत्पादन विक्रेत्यांनी उपलब्ध करून द्यावे, असे हर्डीकर म्हणाले. मंचावर व्हीसीएमडीडब्ल्यूएचे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे, उपाध्यक्ष हितेश पारेख, सचिव विनोद वर्मा, सहसचिव नरेश घोरमारे, वीरेंद्र पात्रीकर होते.
१८ रोजी मुख्यमंत्री
हजर राहणार
प्रशांत उगेमुगे म्हणाले की, आयटी क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींची माहिती राज्य सरकारला करून देण्याच्या उद्देशाने असोसिएशनने १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता डेस्टिनेशन आयटीचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उद्योजक समस्या मांडतील. एक्सपोमध्ये २० पॅव्हेलियन आणि ७२ स्टॉलवर आयटी, टेलिकॉम व आॅफिस आॅटोमेशनची उत्पादने आहेत.
तसेच सुरक्षात्मक उपकरणे, सीसीटीव्ही, घरगुती सुरक्षा, वायफाय सुरक्षा कॅमेरे, शैक्षणिक सॉफ्टवेअर, अॅन्टीव्हायरस सोल्युशन्स, गेम, प्रिंटर्स, की-बोर्ड, वेब कॅम, पेन ड्राईव्ह, स्पीकर्स, पीटीझेड हायरेंज उत्पादनांची रेलचेल आहे. विनोद वर्मा यांनी आयोजनाची रूपरेषा विशद केली. राष्ट्रीय स्तरावर आयोजनाची इच्छा आहे. हे स्वप्न लवकरच होईल, असे ते म्हणाले.
आयटी करिअर
व बिझनेस सेमिनार
सायबर सिक्युरिटी, डाटा सेंटर, डाटा मॅनेजमेंट व स्टोरेज यावरील चर्चासत्रात मायक्रोसॉफ्ट, कास्परस्कॉय, डेल, आयबीएम या नामांकित कंपन्यांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संचालन वीरेंद्र पात्रीकर यांनी केले तर विनोद वर्मा यांनी आभार मानले. यावेळी व्हीसीएमडीडब्ल्यूएचे कोषाध्यक्ष मनोज कुल्लरवार, कार्यकारी सदस्य मुरलीधरन, राजन मानापुरे, प्रमोद वाळके आणि स्टॉलधारक मोठ्या संख्येने होते.(वाणिज्य प्रतिनिधी)