मतदानवाढीसाठी नागपूर मनपाची ‘स्मार्ट’ पावले
By admin | Published: February 17, 2017 07:35 PM2017-02-17T19:35:26+5:302017-02-17T19:35:26+5:30
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मनपा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे.
Next
मतदानवाढीसाठी मनपाची ‘स्मार्ट’ पावले
‘हायटेक’ जनजागृतीवर भर : ‘सोशल मिडीया’चा मोठ्या प्रमाणात उपयोग
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मनपा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. मतदानासंदर्भात जनजागृतीसाठी ‘हायटेक’ मदत घेण्यात येत असून विविध पातळ््यांवर मोहिम राबविण्यात येत आहे. यात ‘सोशल मिडीया’चादेखील मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे. मतांचा टक्का वाढविण्यासाठी स्वतंत्र अभियान राबविणारी नागपूर मनपा राज्यात एकमेव ठरली आहे हे विशेष.
एरवी मनपा प्रशासनाकडून निवडणूकांच्या वेळी ‘होर्डिंग्ज’ आणि बॅनर्सच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात यायची. मागील मनपा निवडणूकांत ५२ टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. बुथ क्रमांक आणि केंद्राची माहिती प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचेदेखील सहकार्य घेण्यात येत आहे. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे आणि उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात ही मोहिम चालते आहे.
सोशल मिडीयावर भिस्त
तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी मनपाकडून ‘सोशल मिडीया’वरदेखील जनजागृती करण्यात येत आहे. यंदा प्रथमच ‘आय विल वोट’ या नावाखाली मनपाने स्वतंत्र आणि महत्त्वाकांक्षी अभियान हातात घेतले. जनतेमध्ये जाऊन कार्यक्रम घेणे, मतदानाचे महत्त्व सांगणे, तो कार्यक्रम फेसबुकवर ‘लाईव्ह’ करणे आणि सेल्फी स्टॅण्डीसमोर ‘सेल्फी’काढून ते फोटो मनपाच्या अधिकृत फेसबुक आणि ‘ट्विटर’ अकाऊंटवर अपलोड करणे असा उपक्रम मनपाची स्वतंत्र यंत्रणा राबवित आहे. मनपाच्या फेसबुक पेजचे फॉलोअर्स गेल्या १५ दिवसांत वाढले आहेत. ‘फेसबुक पेज’वरून मतदान कसे करायचे, हे सांगण्यासोबतच मतदानाबाबत जनजागृती करणारे बोलक्या जाहिरातींतून लोकांना संदेश देण्यात येत आहे.
जनतेपर्यंत नेल्या ‘इव्हीएम’
मतदार जनजागृतीसाठी रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्र, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचा वापर नागपूर मनपा करीत आहे. इतकेच नव्हे तर फुटाळा, महाराजबाग, शहरातील मॉल्स, महाविद्यालये आदी ठिकाणी इव्हीएम मशीन ठेवून प्रत्यक्ष मतदान कसे करायचे याबाबत लोकांना माहिती देण्याचे काम मनपा कर्मचारी करीत आहेत. नागपूर मनपाने पहिल्यांदाच इव्हीएम मशीन लोकांमध्ये नेऊन प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम केले आहे.