नागपूर संघभूमी नव्हे, दीक्षाभूमीच
By Admin | Published: April 15, 2016 02:13 AM2016-04-15T02:13:12+5:302016-04-15T02:13:12+5:30
‘नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात ती डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे,
नागपूर : ‘नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात ती डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे, तर डॉ. आंबेडकरांचे आहे,’ असे प्रतिपादन कन्हैया कुमार याने गुरुवारी केले. धनवटे नॅशनल कॉलेज येथे झालेल्या जाहीर सभेत त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘देशात विशिष्ट विचारसरणीला लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही अन् संघ म्हणजे संसद नाही. संघाचा गणवेश बदलला असला, तरी दृष्टिकोन बदललेला नाही,’ असे तो म्हणाला. ‘मी नागपुरात कुठलाही संदेश द्यायला आलो नाही, तर डॉ.आंबेडकरांचा संदेश घेण्यासाठी आलो आहे. या मातीत त्यांचे संस्कार आहेत.’
‘नागपुरात केवळ ‘हाफपँट’वाले लोक राहात नाहीत, तर पूर्ण डोके असलेल्यादेखील अनेक व्यक्ती आहेत. मी प्रत्येक वर्षी १४ एप्रिल
रोजी नागपुरात येईन,’ असे तो म्हणाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केंद्र शासनाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, परंतु केवळ मतांसाठी हे करण्यात येत असल्याचा आरोपही त्याने केला.
‘जेएनयू’तील प्रकरणासंदर्भात जे आरोप करण्यात येत आहेत, ते
एका षड्यंत्राचा भाग आहेत.
मुळात मी किंवा तेथील कुणीही विद्यार्थी देशविरोधी नाहीत.
सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळावे याची तरतूद केली पाहिजे, परंतु हे तर
शिक्षणात ब्राह्मणवाद आणत आहेत, अशा शब्दांत त्याने केंद्राच्या धोरणांवर टीका केली.
राजकारणापासून कुणीच दूर नाही
‘कन्हैया कुमारने राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. भारतातील प्रत्येक व्यक्ती जन्मापासूनच राजकारणाशी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जुळलेली
असते. मी कुठल्याही संधीच्या प्रतीक्षेत नाही, परंतु राजकारणापासून कुणीही दूर नाही,’ असे तो पत्रकार परिषदेत म्हणाला. (प्रतिनिधी)
कन्हैयावर चप्पलफेक, बजरंग दलाचा गोंधळ
कन्हैया कुमार सकाळी नागपूर विमानतळावर दाखल झाला. तिथून गाडीने निघाल्यावर काही अंतरावरच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत दगडफेक केली. प्रत्यक्ष सभा सुरू असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’चे नारे देत गोंधळ घालायला सुरुवात केली. कन्हैयासमर्थक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला व सभागृहातच हाणामारी सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच मंचावर उभ्या असलेल्या एकाने कन्हैयावर चप्पल फेकली. उपस्थित कार्यकर्त्यांकडून त्याला मारहाण होत असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सरसंघचालकांच्या मुद्द्यावर निरुत्तर
महिलांनी घराबाहेर निघू नये, असे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचे सांगत कन्हैयाने सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली, परंतु त्यांनी संबंधित वक्तव्य कधी व कुठे केले, याबाबत कन्हैयाला पत्रपरिषदेदरम्यान विचारणा करण्यात आली असता, त्याने यावर मौन साधले. या मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर पत्रपरिषद संपल्याचीच घोषणा करण्यात आली.
दीक्षाभूमीला भेट : दीक्षाभूमीवर कन्हैयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली. या वेळी त्याला पाहण्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. बाहेर आल्यानंतर त्याने ‘जय भीम’च्या, तसेच ‘बाबा तेरा मिशन अधुरा, हम सब मिलकर करेंगे पुरा...’ ‘संघवाद से आझादी...’ अशा घोषणा दिल्या.