नागपूर - विज्ञान महाविद्यालयातील १४२ प्राध्यापकांना नोटीस
By admin | Published: August 22, 2016 03:23 PM2016-08-22T15:23:19+5:302016-08-22T15:34:11+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीएसस्सी’ अभ्यासक्रमाच्या ४ सत्रांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडलेले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीएसस्सी’ अभ्यासक्रमाच्या ४ सत्रांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडलेले आहे. विज्ञान महाविद्यालयांतील प्राध्यापक नियमितपणे मूल्यांकनाला येत नसल्याने ही स्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे विद्यापीठाने मूल्यांकनाच्या कामात हलगर्जीपणा करणाºया १४२ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, तरी ‘बीएसस्सी’च्या निकालांचे ओझे अद्यापही कायम आहे. ‘बीएसस्सी’च्या उन्हाळी परीक्षांच्या २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अद्याप होणे बाकी आहे. एकीकडे हिवाळी परीक्षांची तयारी सुरू झाली असताना ‘बीएसस्सी’च्या प्रलंबित निकालांमुळे परीक्षा विभागाची दमछाक होत आहे. मूल्यांकन अतिशय संथ गतीने सुरू आहे. अनेक प्राध्यापक तर मूल्यांकनासाठी येतच नसून काही जण दिवसाला केवळ १५ ते ३० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करत आहेत. काही प्राध्यापक महाविद्यालयातून मूल्यांकनाच्या नावाने निघतात व प्रत्यक्षात फारच कमी वेळ मूल्यांकन केंद्रावर असतात. अनेक प्राध्यापकांनी महाविद्यालयातूनच परवानगी मिळत नसल्याचे कारण सांगितले आहे. या कारणांमुळे ‘बीएसस्सी’चे निकाल अडलेले असून विद्यार्थ्यांचे नाहक नुकसान होत आहे.
याबाबत मागील आठवड्यात विद्यापीठाने विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठकदेखील घेतली. प्रवेशाची अंतिम तारीख १ सप्टेंबर आहे. अशा स्थितीत निकाल लवकरात लवकर लागणे आवश्यक आहे, असे महाविद्यालयांना सांगण्यात आले.